बोभाटा स्पेशल: आषाढी पंढरपूरचे वेगळे रूप

बोभाटा स्पेशल: आषाढी पंढरपूरचे वेगळे रूप

आषाढी एकादशीच्या आनंदसोहळ्यात सहभागी होण्यासाठी आणि आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी पुण्यनगरी पंढरीत जवळपास 10 लाखावर भाविक दाखल झाले आहेत.  देवाच्या मुखदर्शनाची बारी ही गोपाळपूर पर्यंत पोहोचली असून दर्शनासाठी 20 ते 22 तास लागत आहेत.
      
 दरम्यान आज एकादशीच्या पहाटे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देवाची शासकीय महापूजा पार पडली. मुख्यमंत्र्यांनी देवाकडे "महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊदे... उरलेल्या सहा जिल्ह्यातही पाऊस पडू दे" असे साकडे घातले. नुकत्याच मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या मा.सदाभाऊ खोत यांनीसुद्धा आज पहाटे विठुरायाचे दर्शन घेतले. 


पंढरपूरच्या या महायात्रेचा महिमा जसा मोठा आहे तितक्याच मोठ्या आहेत इथल्या समस्या ! हो.. एक ना अनेक समस्या. आणि सर्वात मोठी समस्या आहे ती स्वच्छतेची. 


               
 विकास आणि प्रगतीच्या कितीही गप्पा झाल्या तरी इथल्या अस्वच्छतेबाबत कोणीही मन भरून बोलू शकतं. कारण स्थानिक प्रशासन आणि यंत्रणा शहरातील कचरा आणि घाणीवर नियंत्रण ठेवण्यास साफ अयशस्वी ठरल्या आहेत. रस्त्यावरील पाण्याचे खड्डे, खराब गटारी, जिथे तिथे प्लास्टिक, जागोजागी कचर्‍याचे न उचलेले ढीग आणि त्यांची दुर्गंधी, शौचालयांची कमतरता आणि वर सार्वजनिक रस्त्यावरही मनसोक्त थुंकणारे लोक.. यामुळे पंढरपूरसारख्या मोठ्या पवित्र ठिकाणी आजही भाविकांच्या आरोग्याचे कसे बारा वाजतात याची कल्पना येऊ शकते. यातून लाखों लोकांना पवित्र करणारी चंद्रभागा नदी तरी कशी सुटणार ? तिथेही तेच दृश्य !! सोबत विक्रेत्यांनी भर रस्त्यावर केलेली अतिक्रमणे, दर्शनबारीतील बेशिस्त, या समस्या आहेतच. यासाठी प्रशासनाने जास्त मेहनत घ्यायला हवी. 
       
 पण या मोठ्या गर्दीत सुरक्षा व्यवस्था मात्र कडेकोट आहे. ठिकठिकाणी पोलीस, होमगार्ड, राखीव दल, स्वयंसेवक आपली भूमिका दक्षपणे बजावताना दिसत आहेत. ठिकठिकाणी मोफत अन्नछत्र, दवाखाने उपलब्ध केलेली आहेत. कुठेही वाहतूक व्यवस्था विस्कळीत होताना दिसत नाही. यावर्षी पाऊस नसल्यामुळे भाविकांची संख्या कमी झाली असली तरी टाळ मृदगांच्या गजरात वातावरण दर वर्षी प्रमाणे आजही भक्तीरसात न्हाऊन निघालं आहे. चला वारकऱ्यांच्या या महायज्ञात आपणही सहभागी होऊया. 

          राम कृष्ण हरी