काँगो किंवा डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो हा मध्य आफ्रिकेतला देश. आफ्रिकेतल्या इतर अनेक मागास देशांप्रमाणे हा देशही युरोपीय वसाहतवादाची शिकार ठरला होता. पॅट्रिस लुमुंबा हे काँगोचे पहिले कायदेशीररित्या निवडून आलेले पंतप्रधान. १७ जानेवारी १९६१ या दिवशी त्यांचा खून करण्यात आला. या हत्येच्या कटात अमेरिका आणि बेल्जियम या दोन देशांच्या सरकारांचा समावेश होता.
जवळपास सव्वाशे वर्षांपासून काँगोची दैवरेखा आखण्यात अमेरिका आणि बेल्जियम या देशांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. १८७० मध्ये बेल्जियमचा राजा दुसरा लिओपोल्ड याने सर्वप्रथम या देशाची पाहणी करण्यासाठी मोहीम आखली. त्यानंतर त्याने या प्रदेशावर आपला अधिकार घोषित केला आणि ही जमीन त्याची खाजगी मालमत्ता असल्याचं जाहीर केलं. त्यावेळी त्याने त्या प्रदेशाला कॉंगो फ्री स्टेट असं नाव दिलं. जेव्हा लिओपोल्डने कॉंगो नदीच्या खोऱ्यालगतच्या या प्रदेशावर दावा केला तेव्हा सर्वप्रथम अमेरिकेने त्याला पाठिंबा दिला. अर्थात अमेरिकाही काही 'दूध की धुली' नव्हती. त्यांचेही हितसंबंध गुंतलेले होते. काँगोचं खोरं हा अतिशय संपन्न प्रदेश होता. या प्रदेशात युरेनियमच्या खाणी होत्या.
पण लिओपोल्डने स्थानिक लोकांना रबराचं उत्पादन घ्यायला भाग पाडलं. गुलामगिरीमुळे मजुरांचं आर्थिक शोषण, रोगराई, कुपोषण असे भयानक परिणाम झाले. क्रूर आर्थिक शोषणामुळे आणि अत्याचारांमुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला. आता मात्र अमेरिका मध्ये पडली. अमेरिकेने बेल्जियमला कॉंगो हा देश नियमित वसाहत म्हणून ताब्यात घेण्यास भाग पाडलं. या काळातच अमेरिकेने काँगोच्या प्रचंड नैसर्गिक संपत्तीमध्ये भागीदारी मिळवली. काँगोमधल्या युरेनियमच्या खाणीतून युरेनियमचे साठे अमेरिकेच्या हातात पडले. पुढे हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर टाकलेले अणुबॉम्ब हे याचंच बायप्रॉडक्ट.



