भारतीय क्रिकेट गेली ३ दशके जागतिक क्रिकेटमध्ये दबदबा राखून आहे, कारण दर काही दिवसांनी प्रतिभाशाली असा खेळाडू मैदानात उतरत असतो. प्रथम श्रेणी क्रिकेट हे अनेक दर्जेदार खेळाडूंना समोर आणणारे माध्यम समजले जात असते. पुढे महान ठरलेल्या अनेक खेळाडूंनी पदार्पणात प्रथम श्रेणीत विक्रम केले. मात्र काल प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जो विक्रम झाला तो आजवर देशात काय, पण जगातही झाला नव्हता.
रणजी स्पर्धेत बिहारकडून खेळणाऱ्या सकीबुल गणी या खेळाडूने आपल्या पहिल्याच सामन्यात दणकेबाज असे तिहेरी शतक ठोकले आणि असा विक्रम करणारा तो जगातील पहिला बॅट्समन ठरला. कोलकाता येथे मिझोरम विरुद्ध हा सामना सुरु होता. सकीबुल मैदानात आला आणि इतिहास घडण्यास सुरुवात झाली. ४०५ बॉल्सवर त्याने दनादन ३४१ धावा काढल्या
आपल्याच पहिल्याच सामन्यात सकीबुल स्टार बनला आहे. खरं बघायला गेले तर याआधी सकीबुलचे नावही कुणाला माहीत नव्हते. कारण विजय हजारे ट्रॉफी आणि इतर स्पर्धा तो खेळला असला तरी रणजीसारख्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हे त्याचे पदार्पण होते. पदार्पणातच त्याने इतिहास घडवल्याने जगाचे लक्ष त्याने स्वतःकडे खेचले आहे.
सकीबुल बिहार येथील मोतिहारीमधील एका शेतकरी कुटुंबातून आला आहे. सकीबुलच्या वडीलांना एकूण चार मुले आहेत. चौघांनीही क्रिकेटर बनण्याचे स्वप्न पाहिले. पण एकानेही क्रिकेट खेळावे असे वडिलांना वाटत नसे. पण सकीबुलचा मोठा भाऊ फैजलने वडिलांच्या इच्छेच्या विरुद्ध जाऊन स्वतः क्रिकेट खेळले आणि लहान भावालाही त्यासाठी प्रोत्साहन दिले.
फैजल गणी सांगतो की, "मी ईस्ट झोनचा कॅप्टन राहिलो आहे. पण मला बिहारमध्ये क्रिकेटचे भविष्य दिसले नाही म्हणून मी क्रिकेट सोडले. पण सकीबुलला ट्रेनिंग मिळेल यासाठी मी प्रयत्न केले". फैजल सध्या मोतिहारीला स्पोर्ट्स शॉप चालवतो.
सकीबुलचे टॅलेंट खऱ्या अर्थाने ओळखले ते म्हणजे सी.के. नायडू ट्रॉफीवेळी बिहारचे तत्कालीन कोच अजय रत्रा यांनी. रत्रा यांनी सकीबुलला व्यवस्थित प्रशिक्षण देऊन घडवले. त्याचाच परिणाम म्हणून आज सकीबुल जगात नावाजला गेला आहे. भविष्यात सकीबुल अजून विक्रम करेल यातही शंका नाही.
उदय पाटील




