१९६६ मध्ये तो मनुष्य त्याच्या देशातल्या लोकांच्या नजरेत हिरो ठरला होता. त्याने आखलेल्या सहा कलमी कार्यक्रमामुळे आपलं भलं होईल अशी लोकांना आशा होती. पण सगळेच फासे उलटे पडले. एकेकाळचा हिरो व्हिलन वाटायला लागला. अवघ्या दशकभराच्या आतच त्याला त्याच्या कुटुंबासह संपवलं गेलं. १५ ऑगस्ट १९७५ या दिवशी बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मुजिबुर रहमान यांची त्यांच्या कुटुंबीयांसह हत्या करण्यात आली. असं का झालं याची उत्तरं त्यांच्या कार्यशैलीत दडली आहेत.
१५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला तोच मुळी भारत आणि पाकिस्तान अशा दोन तुकड्यांत विभागणी होऊन. त्यावेळी भारताच्या पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही बाजूंना पाकिस्तान होता. पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान यांचं राहणीमान, संस्कृती, बोलीभाषा सगळंच वेगळं होतं. असं असूनही पूर्व पाकिस्तानवर पश्चिम पाकिस्तानची सत्ता होती. मोहम्मद अली जिना यांनी सुरुवातीपासूनच पूर्व पाकिस्तानबद्दलचे विचार स्पष्ट बोलून दाखवले होते. पूर्व पाकिस्तानने बंगाली भाषा सोडून उर्दू भाषा स्वीकारावी, हा त्यांचा नेहमीचा हेका. पूर्व पाकिस्तानच्या लोकांना नेहमीची दुय्यम दर्जाची वागणूक, सापत्नभाव सहन करणं अशक्य झालं होतं. दरम्यान मुजिबुर रहमान या पूर्व पाकिस्तानच्या नेत्याने सुरुवातीपासूनच स्वतंत्र देशाची मागणी केली होती. त्यासाठी त्यांचा अविरत लढा सुरू होता.
मुजिबुर रहमान हे 'मुस्लिम स्टुडन्ट लीग'चे कार्यकर्ते होते. ही जिनांच्या 'मुस्लिम लीग'ची विद्यार्थी शाखा. पुढे त्यांनी स्वतंत्र संसार थाटत आवामी लीग या पक्षाची स्थापना केली. आपल्या पक्षाद्वारे त्यांनी स्वतंत्र देशाची मागणी परत एकदा रेटली. पूर्व पाकिस्तानवर होणाऱ्या अन्यायालाही विरोध करणं सुरू ठेवलं. त्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेमध्ये प्रचंड वाढ झाली. १९७० च्या निवडणुकांमध्ये त्यांना घवघवीत यश मिळालं. इतकं, की पश्चिम पाकिस्तानातही त्यांच्या पक्षाचे उमेदवार भरघोस मताधिक्क्याने निवडून आले. सत्तांतर होऊन मुजिबुर रहमान यांच्या पक्षाकडे सत्ता जाते की काय अशी स्थिती निर्माण झाली. परंतु पश्चिम पाकिस्तानने त्यांच्या हातात सत्ता द्यायला नकार दिला. इतकंच नाही, तर त्यांना तुरुंगात टाकलं.


