सत्य घटनेवर आधारित चित्रपट बनवण्याची संख्या सध्या वाढत आहे. दाक्षिणात्य चित्रपट ‘जयभीम’ नंतर आता चर्चा सुरू आहे ती ‘२०० हल्ला हो‘ची. अमोल पालेकर, रिंकू राजगुरू, उपेंद्र लिमये, बरून सोबती, इंद्रनील सेनगुप्ता असे स्टारकास्ट असलेला हा सिनेमा नागपूरमध्ये १७ वर्षापूर्वी घडलेल्या एका जमावाने हल्ला करुन खून करण्याच्या घटनेवर आधारित आहे.
२०० पेक्षा जास्त महिलांनी नागपूरमधील भरत कालीचरण ऊर्फ अक्कू यादव नावाच्या एका बेलगाम गुंडाचा कोर्टाच्या आवारातच खून केला होता. त्याला संरक्षण देण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांनाही या महिलांनी सोडलं नव्हतं. कोण होता हा भरत कालीचरण ऊर्फ अक्कू यादव, आणि महिलांना त्याची एवढी चीड का होती? जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख नक्की वाचा.
नागपूरमधील कस्तुरबा नगरमध्ये राहणाऱ्या महिलांना या भरतने अगदी जगणे नकोसे करून टाकले होते. भरत कालीचरण या वस्तीतला एक महागुंड. पोलिसांना दारू आणि पैसे चारून त्यांचे तोंड बंद केल्याने भरतला हटकणारे कोणी नव्हतेच. पैसा आणि पोलिसांचे संरक्षण यामुळे भरत म्हणजे जणू एक हिंस्न्र पशू बनला होता. कस्तुरबा नगरात राहणारी एकही महिला सुरक्षित नव्हती. कारण या वस्तीतील तब्बल ४० महिलांवर भरत आणि त्याच्या साथीदारांनी मिळून बलात्कार केले होते. काही जणींची तर बलात्कार करून निर्घृण हत्या केली होती. त्याचे क्रूर कारनामे वाचून तुम्हीही हादरून जाल.


