घरात ताजी भाजी नसेल, किंवा आता आज स्वयंपाक काय करायचा असा प्रश्न पडतो, तेव्हा उत्तर म्हणून समोर येतो तो म्हणजे बटाटा!! शाळेत टिफिनमध्ये किंवा कुठे एकदिवसीय सहलीवर जायचे असेल तर टिफिनमध्ये हमखास दिसणारा पदार्थ म्हणजे बटाटा. आज बटाटा आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. असे असले तरी कधीकाळी हा बटाटा म्हणजे लोकांना शत्रू वाटत होता. कधीकधी गोष्टींना सुरुवातीला विरोध होतो आणि नंतर ती गोष्ट आयुष्याचा भाग बनते. बटाट्याबाबतही असेच काहीसे घडले. आज जाणून घेऊयात हा सारा इतिहास!!
बटाट्याला झालेला विरोध आणि त्याचा स्वीकार हे वाचण्याआधी बटाट्याचा थोडक्यात इतिहास समजून घेऊ.
बटाट्याचा उद्भव हा तब्बल ७,००० ते १०,००० वर्ष जुना सांगितला जातो. याचे मूळ हे दक्षिण अमेरिकेतला पेरू/परु नावाचा देश आणि बोलिव्हिया असल्याची माहिती आहे. नंतर बटाटा हे पीक पूर्ण अमेरिका खंडात पसरले. उत्तर अमेरिका म्हणजे युनायटेड स्टेटस तर दक्षिणेला चिलीपर्यंत बटाटा लोकांच्या जीवनात दाखल झाला. एखादा प्रदेश जिंकल्यावर जेत्या लोकांची संस्कृती आपोआप तिथे दाखल होते. बटाटा असाच हळूहळू जगात पसरत होता. १६ व्या शतकात स्पेनने इन्का साम्राज्य जिंकून घेतले तेव्हा युरोपात बटाटा शिरला. हळूहळू युरोपियन शेतकऱ्यांनीही बटाटा पीक पण स्वीकारले. १९ वे शतक येईपर्यंत बटाटा युरोपातला महत्वाचा अन्नपदार्थ झाला होता.
दक्षिण अमेरिकेतून स्पेनमध्ये जाण्याचा बटाट्याचा प्रवास होत होता. त्यावेळी मध्ये थांबा लागला तो कॅनरी आयलँड्सचा. गोष्ट १५६७ सालची आहे. बटाटा, संत्री आणि लिंबू यांचे तीन बॅरल ग्रॅन कॅनरिया ते अँटवर्पकडे नेले जात होते. पुढे १५७४ साली ग्रॅन कॅनरियामार्गे दोन बॅरल बटाटे रौयनला शिफ्ट झाले. एखादा पदार्थ निर्यात करण्याएवढे महत्वाचा होण्यास पाच वर्षे लागतात हे जरी गृहीत धरले तरी बटाटा महत्वाचा होण्यामागे पहिली घटना कारणीभूत म्हटली पाहिजे. सुरुवातीच्या काळात तर बटाटे फक्त दिसायला सुंदर म्हणून आणि बॉटनिकल गार्डनमध्ये दुर्मिळ म्हणून युरोपला निर्यात केले जात होते. अशा पध्दतीने बटाट्यांनी हळूहळू जगभर पसरण्यास सुरुवात केली.

