शाळेत असताना तुमच्याकडे अर्धा भाग लाल आणि अर्धा भाग निळा असलेला खोडरबर नक्कीच असेल. कोणीतरी तुम्हाला हेही सांगितलं असणार की त्याच्या लाल टोकाने पेन्सिलच्या आणि निळ्या टोकाने पेनाच्या चुका खोडायच्या असतात. आणि या निळ्या टोकाने शाई खोडण्याच्या प्रयत्नात आपल्यापैकी बर्याच जणांनी सगळा कागद फाडून ठेवला असेल.
शाळेत असताना आपला कशावरही विश्वास बसायचा. पण या पेनाच्या खोडरबरबद्दलचा गैरसमज मोठेपणीही पुसला जात नाही. यापेक्षा मोठी गंमत म्हणजे लोकांचा गैरसमज दूर होत नाही म्हणून खोडरबर कंपन्यांनी त्याच्यावर नाईलाजाने हा भाग पेनाचा आणि हा भाग पेन्सिलीचा असंही छापायला सुरूवात केली. आणि तरीही आजपर्यंत आपल्याला कधीही या खोडरबरच्या निळ्या टोकाने पेनची शाई खोडता आलेली नाही. पण खरंतर हा निळा भाग पेनसाठी नसून पेन्सिलसाठीच असतो...
या खोडरबरच्या लाल भागाने पातळ कागदावरचे पेन्सिलचे हलके डाग पुसले जातात. तर त्याचा निळा भाग हा विशेषतः जाड कागदासाठी असतो. या निळ्या टोकाने पेन्सिलने झालेले मोठे हट्टी मार्क्सपण सहज खोडता येतात. त्यासाठी रबरचा निळा भाग हा मोठा आणि घट्ट असतो.
तेव्हा पेनाने झालेल्या चुकांवर उगाचच रबर घासत बसणाऱ्या तुमच्या मित्रांना व्हाईटनर वापरायचा सल्ला द्या. आणि त्यांच्यासाठी हा लेख पण शेअर करा..
