आयुर्वेद सांगतय: निरोगी दीर्घायुष्यासाठी शरीर कसं असावं?

आयुर्वेद सांगतय: निरोगी दीर्घायुष्यासाठी शरीर कसं असावं?

आयुष्याच्या तीन अवस्था असतात. आयुर्वेदाने वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत बालपण, सत्तर वर्षांपर्यंत मध्यमवय आणि सत्तर वर्षांनंतर वृद्धपण सांगितलेलं आहे.

आयुर्वेदात शारीर लक्षणांची यादी सांगितलेली आहे जी आरोग्याच्या दृष्टीने प्रशस्त म्हणजे चांगली मानण्यात आली आहे.

आपण या लक्षणांची माहिती करून घेऊ या -

- केस तुळतुळीत, मऊ, स्थिर म्हणजे सहज उपटले न जाणारे असावेत.

- कपाळ उंच असावे, कानशील फुगलेले आणि अर्धचंद्राकार असावेत.

- कान खाली झुकलेले, उभारलेले, मांसल आणि पाळी चिकटलेल्या असाव्यात.

- डोळ्याचा काळा आणि पांढरा भाग स्वच्छ आणि इतर कोणत्याही वर्णांचा त्यात अन्तर्भाव नसावा. पापण्यांचे केसही दाट नि बळकट असावेत.

- नाक सरळ, अपरं आणि नाकाचं छिद्र मोठं असावं.

- ओठ लाल रंगाचे मात्र फार पुढे आलेले नसावेत.

- जबडा मोठा पण उंच नसावा.

- तोंड मोठं असावं, दात विरळ नसावेत, ते पांढरे, स्निग्ध, गुळगुळीत अाणि एकसारखे असावेत.

- जीभ लाल, पातळ आणि लांब असावी.

- हनुवटी मांसल आणि मोठी असावी.

- मान आखूड, जाड आणि गोल असावी.

- खांदे पुष्ट आणि उन्नत असावे.

- पोट अंमळ उंच (सुटलेलं नव्हे) पण नाभी खोल असावी.

- नखं लाल, पातळ आणि फुगीर असावीत.

- हात-पाय मोठे, स्निग्ध आणि मांसल असावेत तर बोटं लांब असावीत, त्यांच्यात फटी नसाव्यात.

- पाठ मोठी आणि कणा बुजलेला म्हणजे मांसाच्छादित असावा.

- सांधे लठ्ठ आणि बळकट असावेत.

- आवाज गंभीर आणि नादमय असावा.

- त्वचा स्निग्ध आणि वर्णाने तेजस्वी असावी.

- रोगावस्थेतही बल कायम राहणारं असावं.

वर वर्णन केलेल्या लक्षणांनी युक्त शरीर हे ऐश्वर्य आणि सर्व इष्ट गोष्टींची प्राप्ती घडवणारं तथा आरोग्यपूर्ण शंभर वर्षाचं आयुष्य मिळवून देण्यात उपयुक्त असतं, असं आयुर्वेदाचे ग्रंथ प्रतिपादन करतात.

आता पहा, आपल्या शरीरात यापैकी किती लक्षणं दिसतात?