रांधा-वाढा-उष्टी काढा हे तुम्ही स्वत: करा नाहीतर त्यासाठी नोकर लावा, हे का रोजचं असतंच असतं. त्यातलं उष्टी काढा हे खरंतर सफाईच्या कामाचं प्रतिक आणि घराची, घरातल्या वस्तूंची साफसफाई हे असंच एक न टाळण्याजोगं काम!! साफसफाई करण्यासाठी वापरायच्या पारंपरिक साधनांमध्ये तसा कालानुरूप फारसा फरक झालेला नाही. झाडू, कुंचे, पुसण्यासाठीची फडकी आणि बादल्या ही साधनं अगदी पूर्वीपासून वापरात आहेत. या साधनांचं मॉडर्न स्वरूप म्हणजे व्हॅक्युम क्लीनर. व्हॅक्युम क्लीनरमुळे स्वच्छता या शब्दाबद्दलची आपली कल्पना बदलली आहे.
आजच्या आधुनिक व्हॅक्युम क्लीनरचा पूर्वज म्हणजे कार्पेट स्वीपर. याचा शोध डॅनियल हेस या संशोधकाने १८६० मध्ये लावला होता. या यंत्रात त्याने भात्यांचा वापर केला होता. या भात्यांच्या मदतीने हवा यंत्राच्या आतमध्ये ओढून घेता येत असे. हवेबरोबर धूळ आणि मातीचे बारीक कण, इतर सूक्ष्म कचरा हेही आत ओढलं जायचं. याखेरीज यात फिरत्या स्पिनिंग ब्रशचाही वापर केलेला होता.






