दिवाळीत बरेच चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. थिएटर्स नुकतीच उघडल्यामुळे गेल्या दीड वर्षांचा सिनेउपवास सोडायचा लोकांचा उत्साह आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवरही अनेक चित्रपट प्रेक्षकांना आवडत आहेत. यातच साऊथ फिल्म इंडस्ट्रीतला सुपरस्टार सूर्या शिवकुमारचा चित्रपट 'जय भीम' दिवाळीत प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. या चित्रपटात सूर्याने एका वकिलाची भूमिका साकारली आहे, के. चंद्रू हे त्या वकिलाचे नाव. हा वकिल नेहमीच गरीब आणि आदिवासी लोकांसाठी उभा राहतो. त्यांच्या न्यायासाठी लढा देतो. म्हणजे अगदी खऱ्या अर्थाने हिरो आहे. सूर्याने साकारलेल्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. या चित्रपटात सूर्याने साकारलेली वकिलाची भूमिक ज्यांच्या आयुष्यावर बेतली आहे, म्हणजे के. चंद्रू हे खऱ्या आयुष्यात कोण आहेत, त्यांनी कार्य कसे होते याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
वकील आणि न्यायाधीशांच्या सामाजिक कार्याबद्दल आणि यशोगाथांबद्दल फारसे बोलले जात नाही. कदाचित त्यामुळेच न्यायमूर्ती चंद्रूंबद्दल अजूनही अनेकांना माहिती नव्हती. के. चंद्रू हे फक्त पात्र नाही, ही व्यक्ती खरोखरीच अस्तित्वात आहे. ते मद्रास उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आहेत. त्यांनी अनेक वर्षे वकील म्हणून आदिवासींच्या हक्कांसाठी आवाज उठवला, त्यांना न्याय मिळवून दिला आणि तेही एक पैसाही मोबदला न घेता! आजच्या काळात वकिल म्हणले की त्यांची अव्वाच्या सव्वा फी आठवते, पण के. चंद्रू एकही पैसा न घेता या समाजाच्या हक्कासाठी लढले. कितीतरी लोकांना त्यांनी न्याय मिळवून दिला आहे.



