१८५७ चा काळ होता. भारतावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेचा उदय होत होता. भारतातली जुनी राजेशाही जात होती, नवीन गोरे साहेब येत होते, कुठे उठाव होण्याची चिन्हे होती तर कुठे युद्धाला तोंड फुटणार होते. इस्ट इंडिया कंपनीतील भारतीय शिपाई अस्वस्थ होते, ब्रिटिश आपला धर्म भारतीयांवर लादतील ही एक वेगळी भीतीही डोकं वर काढत होती. असा हा एक मोठ्या बदलाचा काळ होता. अशा या धामधुमीच्या काळात एका अगदी छोट्या घटनेने आपले पाय पसरायला सुरुवात केली आणि अख्खा देश या घटनेत सामील झाला. ही घटना म्हणजे चपाती चळवळ.
चपाती चळवळ म्हणजे काय हे खरं तर कोणालाही ठाऊक नाही. अगदी इतिहासकार आजही या घटनेचा अर्थ लावू शकलेले नाही. पण ती सुरु झाली होती खरी.
जास्त वेळ न घेता चपाती चळवळ काय होती हे आधी समजून घेऊया.




