लहान मुलांचा मोबाईलकडे आपसूक ओढा असतो. गेम्स, कार्टून अशा गोष्टींमुळे मुले मोबाईलचा जास्तीतजास्त वापर करतात. पालक पण कधी मुलांचे मनोरंजन व्हावे म्हणून, कधी मुलांनी 'डिस्टर्ब' करू नये म्हणून, तर कधी मुले टेक्नोसॅव्ही व्हावी म्हणून मुलांकडे मोबाईल देत असतात. पण हे महागात पडू शकते. यामागे अनेक कारणे आणि उदाहरणे देता येतील. नुकतेच इंग्लंडमध्ये एका पालकाला आपल्या मुलाच्या पराक्रमामुळे कार विकावी लागली आहे.
युकेतील नॉर्थ वेल्स येथे अयाज नावाचा ७ वर्षांचा मुलगा आपल्या वडिलांच्या आयफोनमध्ये ड्रॅगन्स राईज ऑफ बर्क्स हा गेम खेळत होता. तुम्ही बघितले असेल की बऱ्याच गेम्समध्ये काही लेव्हल या फ्री असतात तर त्यापुढील लेव्हलसाठी किंवा नव्या फिचर्ससाठी पैसे मोजावे लागतात. या मूलाचे वडील मोहम्मद मुताजा यांनी तासाभरानंतर मोबाईल घेतला तर आपल्या लाडक्याने तब्बल १.३३ लाखाची खरेदी करून ठेवली असल्याचे त्यांच्या लक्षात आले.






