दिवाळीमध्ये आपण आतिषबाजी बघितली असेल, फटाके फुटताना बघितले असतील पण दिवाळी झाल्यानंतर आतिषबाजीने युद्ध खेळलेलं कधीच बघितलं नसणार. इंदौर मधल्या 'गौतमपुरा' भागात हा जीवघेणा खेळ खेळला जातो. या खेळाला ‘हिंगोट युद्ध’ म्हणतात.

सर्वात आधी हे हिंगोट काय आहे ते समजून घेऊ. मंडळी हिंगोट म्हणजे एक प्रकारे नारळा सारखं फळ असतं. दिवाळी पूर्वीच या फळाला सुखवून त्याच्या आतील गर काढला जातो. यामुळे आत पोकळ जागा तयार होते. जणूकाही दारुगोळ्याच्या वरचं कवच तयार होतं.
आता येऊया या युद्धाकडे :
ही एक प्राचीन युद्ध परंपरा असून इंदौर भागातील तुर्रा आणि कलंगी समूहांमध्ये खेळली जातो. गौतमपुरा, देवनारायण मंदिराच्या समोरच्या जागेत हे युद्ध होतं. खेळाची तयारी भरपूर दिवसाधी पासूनच सुरु होते. हिंगोट फळाच्या आतील रिकाम्या भागात आतिषबाजीची दारू, दगड भरून त्याला शिवलं जातं. एक प्रकारे याचं बॉम्ब मध्ये रुपांतर होतं.
हिंगोटचे रुपांतर तोफ गोळ्यात झाल्यावर युद्धासाठी दोन्हीकडचे तयार होतात. प्रत्येकजण आपल्या हातात हिंगोटची पिशवी घेऊन उभा राहतो आणि त्यातील एक एक गोळा प्रतिस्पर्धीवर फेकत जातो. यात खरा निशाणा असतो ती पिशवी ज्यात सगळे हिंगोटचे गोळे असतात. या पिशवीला एकदा आग लागली की समजा त्याचा खेळ संपला.
या खेळला पूर्वीपासूनच विकृत रूप मिळाले आहे. यात अनेकजण गंभीर जखमी होतात, अनेकांचा जीवही जातो. तरी या खेळला एक वेगळंच ‘ग्लॅमर’ आहे. दरवर्षी प्रचंड उत्साहात माणसं युद्धात भाग घेतात आणि त्याच जोशात बघणारेही तिथे उपस्थित असतात. या युद्धाची एक खासियत म्हणजे यात कोणीही जिंकत किंवा हारत नाही पण काहीजण जगाला कायमचं ‘टाटा बाय बाय’ नक्कीच करतात.

स्रोत
हिंगोट युद्ध एका प्रेक्षकाप्रमाणेही बघता येऊ शकतं. यावेळी प्रेक्षकांसाठी एक सुरक्षित जागा निश्चित केलेली असते पण यामुळे काही धोका टाळतो असं नाही.
मंडळी भारत अनेक अजब परंपरांनी बनला आहे, हिंगोट युद्ध त्यातलीच एक जीवघेणी पण लोकांना आकर्षित करणारी परंपरा आहे !!


