रोज अनेक व्हिडीओ किलो किलोने सोशल मिडीयावर व्हायरल होत असतात. त्यातलाच एक व्हिडीओ म्हणजे 'सॉलूशन' पिणाऱ्या कमलेश या मुलाचा व्हिडीओ. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कमलेशच्या सॉलूशन पिण्यावर प्रचंड जोक्स, मिम, फनी व्हिडीओ तयार झाले. काहींनी तर चक्क याच्या डायलॉगवर रिमिक्स गाणी तयार केली. काहींना हा मुलगा खोटा वाटेल, फेक वाटेल, पण दुर्दैवाने हा मुलगा खराखुरा आहे. दिल्ली भागात हा राहतो आणि याच्यासारखेच अनेकजण आहेत जे व्यसनाधीन झालेत.
हा व्हिडीओ शूट केला आहे "धीरज शर्मा" नावाच्या सामाजिक कार्यकर्त्याने. धीरज शर्माने “नशेबाज- द डाइंग पीपल ऑफ दिल्ली” ही डॉक्युमेंटरी अंमलीपदार्थांच्या आहारी गेलेल्या माणसांवर बनवली होती. याच फिल्मचा एक भाग म्हणजे या मुलाचा व्हिडीओ. या फिल्मचा ट्रेलर जर तुम्ही बघितला तर तुम्हाला दिसून येईल की कमलेश हे एक खूपच लहान उदाहरण आहे. त्याहीपेक्षा जास्त नशेच्या आहारी गेलेली माणसं आज दिल्लीत जगतायत. त्यातील एकाने तर म्हटलंय की मरणाची भीती नाशेबाजांना कधीच नसते. हा असा डायलॉग फक्त नशेत असणारा माणूसच बोलू शकतो.

धीरज शर्मा स्रोत
धीरज म्हणतो त्याप्रमाणे “मला ही डॉक्युमेंटरी बनवण्यासाठी ६ वर्ष लागले. मी स्वतः अश्या दिल्लीच्या रस्त्यांवर माणसांमध्ये राहिलो. पण ज्या प्रकारे एका १३ वर्षाच्या मुलाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्याचा जोक तयार झाला याची मी कधीच अपेक्षा केली नव्हती. यावरून आपली मानसिकता दिसून येते.” जागरूकता तर सोडाच पण डॉक्युमेंटरी मागील वास्तव जाणून न घेता या व्हिडीओला चक्क मनोरंजन म्हणून बघितलं गेलं. एका गंभीर विषयाची अशी गत होणार असल्याचं कोणीही विचारही केला नव्हता.
‘नशेबाज- द डाइंग पीपल ऑफ दिल्ली’ या डॉक्युमेंटरीचं पाहिलं स्क्रीनिग लंडन मध्ये झालं. लंडन मध्येच धीरजच्या कामाचं कौतुक झालं आणि फिल्मला पहिला पुरस्कार मिळाला. ज्या लोकांनी या कमलेश वर जोक्स तयार केले त्यांच्यासाठी खास एक व्हिडीओ बनवण्याचं काम धीरज करत आहे.
मंडळी हे एक दिल्ली मधलं उदाहरण झालं पण संपूर्ण देशात अशी अनेक मुलं आणि माणसं दिसून येतात. या मुलांना ओळखणं सोप्प असतं. एका हातात रुमाल आणि आणि अंगावर मळके कपडे. त्या रुमालातून वास घेत हे भिक मागत असतात. यांना खायला नको असतं फक्त पैसे हवे असतात. मग समजा एखाद दिवशी नाश करण्यासाठी पैसे नसतील तर हीच मुले गुन्हेगार होऊ शकतात.
शेवटी व्हिडीओ मध्ये जर एक १३ वर्षाचा मुलगा “जगात आईपेक्षाही सॉल्युशन जास्त महत्वाचं आहे.” असं म्हणत असेल तर बाब खरच गंभीर आहे.
(सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.)
©बोभाटा

