आता तुम्हाला भारतीय रेल्वेची ओळख नव्याने करून देण्याची काहीच गरज नाही. भारताचा कणा असलेली ही रेल्वे इंग्रजांच्या काळापासून आपली सेवा अव्याहतपणे बजावत आहे. तुम्हीही कधी कधी किंवा रोजच न चुकता आणि कधी कधी न बसता अगदी उभ्याने रेल्वेची सवारी करत असाल. पण आज आपण पाहात आहोत भारतातील काही लक्षवेधी आणि सुंदर रेल्वेमार्ग. ज्यावरून प्रवास करणं म्हणजे जणू स्वर्गसुखच...
भारतीय रेल्वेचे ६ भन्नाट मार्ग; चौथ्या मार्गावरून तुम्ही प्रवास नक्कीच केला असणार!!


१. पंबन - रामेश्वरम रेल्वे मार्ग
हा थोडाथोडका नाही तर चक्क २.३ कि.मी लांबच लांब असलेला हा समुद्रातला रेल्वेमार्ग रामेश्वरमला भारतातल्या इतर भागांशी जोडतो. या पूलावरुन प्रवास करताना समुद्राचे विहंगम दृश्य आणि थरार लाजवाब वाटतो. नाहीतरी आयुष्यात एकदा का होईना रामेश्वरला जाऊन यावं म्हणतात. पाहा, संधी घ्या आणि या एकदा जाऊन रामेश्वरमला..

२. काझीगुंड - श्रीनगर - बारामुल्ला बर्फाळ रेल्वे मार्ग
काश्मीरच्या दऱ्याखोर्यातून प्रवास करणारी ही रेल्वे तुम्हाला काश्मिरी निसर्गाची खऱ्या अर्थाने ओळख करून देते. सगळीकडे दिसणारी बर्फाळ पर्वतशिखरे आणि येथील शुभ्र सौंदर्य अनुभवण्यासाठी हिंवाळ्यात किमान एकदातरी नक्की या रेल्वेतून प्रवास करायलाच हवा. ’जर जगात स्वर्ग कुठे असेल तर तो फक्त इथेच आहे’ असं म्हणणार्या काश्मिरी जनतेचा स्वर्ग रेल्वेतून कसा वाटतो ते पण बघाच.

३. कालका - शिमला टॉय ट्रेन
पर्यटनाच्या एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाणार्या या ट्रेन सफारीला युनेस्कोने जागतिक वारसा घोषित केलंय. चक्क १०३ भुयारं, ८०० पूल आणि कित्येक दऱ्यांतून जाणारी ही रेल्वे जागोजागी खास तुमच्यासाठी थांबत जाते. पर्यटकांना खाली उतरून फोटोग्राफी करण्याची मुभाही देते. घनदाट जंगल आणि पहाडी भागातून प्रवास करणारी ही रेल्वे १९०३ पासून सुरू आहे. शेवटी आपली काळजी इंग्रजांनाच जास्त होती असं दिसतंय खरं!!

४. हुबळी - मडगांव रेल्वे (दुधसागर)
पावसाळ्यात कोकण रेल्वेनं प्रवास करण्याइतकं दुसरं सुख नाही. हो, पण त्यासाठी एसी डब्याचं तिकिट मात्र बिल्कुल काढू नका. सेकंडक्लास स्लीपर कोचचं तिकिट घ्यायचं आणि मस्तपैकी दरवाजात पायरीवर बसायचं. प्रवास कसा संपला कळणारही नाही. पण हो, दारात बसताना नीट काळजी मात्र नक्की घ्या हं.. वरच्या फोटोत दिलेल्या गोवा - कर्नाटकला जोडणाऱ्या या रेल्वेमार्गावर अनेक सुंदर धबधबे, घाट आणि जंगलं आहेत. सोबतीला खूप सारी भुयारंही.. ही रेल्वे प्रसिद्ध दुधसागर धबधब्याच्या अगदी जवळून जाते. हो, तोच तो चेन्नई एक्स्प्रेस वाला धबधबा! इतक्या जवळून की धबधब्याचे तुषार तुम्ही ट्रेनमधूनच अंगावर घेऊ शकता.

५. जम्मू - उधमपुर रेल्वे
चिनाब नदीवरून जाणारा हा मार्ग जगातला सर्वात उंचावरचा रेल्वे मार्ग आहे. चिनाबवर बांधण्यात आलेल्या या ब्रीजची उंची ३५९मीटर्स आहे. म्हणजेच हा पूल आयफेल टॉवर पेक्षाही उंच आहे!! बापरे!!!
हा पूल आणखी कुणी नाही तर आपल्या कोकण रेल्वेने बांधलाय. जाऊन या तिकडे पण एकदा...

६. दार्जिलिंग हिमालयातला रेल्वेमार्ग
इंग्रजांनी रेल्वे, पोलिस आणि टपाल खात्यासोबतच आणखी काही केलं असेल, तर ती हिल स्टेशन्स वसवणं. शिमला, दार्जिलिंग, माथेरान ही सगळी त्यात आलीच. हा आहे दार्जिलिंगकडे जाणारा हिमालयीन रेल्वेचा मार्ग. विश्वास बसत नाही ना, हा फोटो भारतातलाच असेल यावर? ’बर्फी’ सिनेमातली गावातून जाणारी टॉय ट्रेन आठवतेय? तिचा अनुभव घ्यायचा असेल तर या ट्रेनने प्रवास करायलाच हवा.