महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत. यात सातारा जिल्ह्याचे महत्व मात्र उठून दिसावे असे आहे. राजधानी सातारा म्हणून प्रसिद्ध असलेला हा जिल्हा अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. इतिहासाप्रमाणे वर्तमानातही साताऱ्याचे महत्व कमी झालेले नाही.
साताऱ्याचा इतिहास प्रचंड मोठा आहे. इसवीसन पूर्व कालखंडापासून सातवाहन चालुक्य घराण्यांनी इथे राज्य केले आहे. तसेच १२ व्या शतकात शिलाहार वंशातील राजा दुसरा भोज यांनी जिल्ह्यात अनेक ठिकाणी किल्ले बांधले. अजिंक्यतारा यांनीच बांधले असल्याचे काही ठिकाणी म्हटले जाते. भोज राजाचा पराभव यादवांनी केल्यावर इथे यादव राज्य आले. यादवांचे पतन झाल्यावर बहामनी राज्य दक्षिणेत बहरले. सातारा किल्ल्याची दुरुस्ती स्वतः महंमदशाह बहामनी याने केली होती.
बहामनी सत्तेनंतर इथे आले आदिलशाही राज्य. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करत मोठा प्रदेश स्वराज्यात सामील करून घेतला होता. जावळी पादाक्रांत करणे असो की अफझलखानाचा निःपात करून वाई प्रदेश जिंकणे असो, स्वराज्यात सातारा समाविष्ट होत गेले. पुढे राजाराम महाराजांनी सातारा ही मराठ्यांची राजधानी केली. पुढे शाहू महाराजांच्या अखत्यारीत सातारा आल्यावर ते संस्थान म्हणून ओळखले जाऊ लागले.
१८१८ सालापासून ईस्ट इंडिया कंपनी, तर १८५७ नंतर इंग्रज सरकार यांचा अंमल इथे होता. देश स्वतंत्र झाल्यावर सांगली, मिरज, जत, औंध, फलटण ही संस्थाने समाविष्ट करून प्रचंड मोठा असा सातारा जिल्हा निर्माण झाला. पुढे उत्तर आणि दक्षिण असे दोन सातारा जिल्हे तयार झाले. शेवटी १९६० साली महाराष्ट्र राज्य म्हणून अस्तित्वात आल्यावर दक्षिण सातारा सांगली जिल्हा म्हणून ओळखला जाऊ लागला तर उत्तर सातारा फक्त सातारा म्हणून उरला.



