स्त्रियांना सहसा सुलताना म्हटलं जातं. पण रझिया स्वत:ला सुलतान म्हणून घेत असे. गुणसंपन्न, पण फ्रक्त स्त्री असल्याने आपल्याच सरदारांकडून नाकारल्या गेलेल्या आणि राजसत्तेसाठी संघर्ष केलेल्या रझिया सुलतानची ही कहाणी!!
आज मुलगा आणि मुलगी दोघांनाही वडिलांच्या संपत्तीत समान वाटा दिला जात असला तरी, मुलीची सासरी बोळवण करताना तिला हुंडा दिला जातो आणि याबदल्यात तिच्याकडून संपत्तीवरील हक्काचे सोडपत्र लिहून घेतले जाते. अनेक मुली आजही संपत्तीतील आपला वाटा उघडपणे मागू शकत नाहीत किंवा त्यांना त्यांचा वाटा देणे अनिवार्य आहे असेही समजले जात नाही. एकविसाव्या शतकात जर अजूनही मुलींना आपले वारस म्हणून स्वीकारले जात नसेल तर, तेराव्या शतकात काय अवस्था असेल जरा विचार करा. त्याकाळी तर मुलींना समाजात किती दुय्यम स्थान असेल? हो ना? पण अशाही सामाजिक परिस्थितीत एका पित्याने आपल्यानंतर आपल्या राज्याचा कारभार आपली मुलगीच सांभाळेल असा विचार करून तिच्याकडे राज्याची सूत्रे सुपूर्द केली होती. ही गोष्ट जगाच्या कुठल्यातर दूरच्या कोपऱ्यात नाही, तर आपल्या भारतात आणि तीही दिल्लीत घडलेली आहे.
१३व्या शतकात दिल्लीवर कुतुबुद्दीन ऐबकाचे राज्य होते. कुतुबुद्दीन ऐबकने ११९०च्या दरम्यान इल्तुमिश नावाचा एक गुलाम विकत घेतला होता. इल्तुमिश गुलाम म्हणून दिल्लीत आला असला तरी आपल्या कर्तृत्वाने ऐबकच्या राज्यात त्याने एवढी मोठी झेप घेतली की त्याला संपूर्ण प्रदेशाचा राज्यपाल बनवण्यात आले. कुतुबुद्दीन ऐबकाच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसांमध्ये माजलेल्या बंडाळीचा फायदा घेत इल्तुमिशने स्वतःलाच दिल्लीचा राजा घोषित केले. अशा प्रकारे एक गुलाम दिल्लीचा सुलतान बनला. राजा इल्तुमिशला दोन मुले आणि एक मुलगी अशी एकूण तीन अपत्ये होती. इल्तुमिश यांनी मुलगा मुलगी भेद न करता तिघांनाही समान शिक्षण दिले. आपल्या तिन्ही मुलांचा विचार करता त्यांना आपल्या पश्चात आपली मुलगीच राज्याचा कारभार समर्थपणे चालवू शकते असा विश्वास वाटल्याने तिलाच आपला वारस घोषित केले. पितृसत्ता आणि पुरुषप्रधान संस्कृतीला इल्तुमिश राजाचा हा निर्णय पचनी पडणे कदापीही शक्य नव्हते. राजानंतर गादीवर बसण्याचा अधिकार मिळालेल्या या मुलीला निव्वळ पुरुषप्रधानतेचा रोष म्हणून आपल्या हक्कापासून वंचित राहावे लागले. आपले हक्क मिळवण्यासाठी या मुलीला आपल्याच भावांशी लढावे लागले. आपल्या हक्कासाठी तिने लढाही दिला आणि आपले ध्येयही साध्य केले. ही कथा आहे, भारताच्या इतिहासातील पहिली आणि शेवटची मुस्लीम महिला शासक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रझिया सुलतानची!




