भारत हा विविध धर्मपंथाच्या लोकांचा धर्मनिरपेक्ष देश आहे. इथे सर्वच धर्मियांच्या प्रार्थनास्थळांचा सारखाच आदर केला जातो. अमृतसरमधील सुवर्ण मंदिर हे शिखांचे गुरुद्वारा असले तरी तिथे भेट देणाऱ्या इतर धर्मीय भाविकांची संख्याही खूप मोठी आहे. या गुरुद्वाराला मंदिर म्हणूनच ओळखले जाते, यावरूनच इथली सांकृतिक विभिन्नता किती एकरूप झालेली आहे याचा अंदाज येतो.
इसवी सन १५७४ मध्ये या गुरुद्वाराचा पाया रचला गेला आणि १६०४ मध्ये याचे बांधकाम पूर्ण झाले. याला श्री हरमिंदर साहिब मंदिर म्हणूनही ओळखले जाते. याला सुवर्ण मंदिर म्हटले जाते कारण या मंदिराचा कळस सोन्याने मढवलेला आहे. हे मंदिर म्हणजे देश-विदेशातील भाविक आणि पर्यटकांसाठी एक आकर्षणाचे केंद्र आहे. या सुवर्ण मंदिराशी निगडीत काही रोचक गोष्टी आज आम्ही या लेखातून घेऊन आलो आहोत.
१) या पवित्र स्थळी बुद्धाने ध्यानधरणा केली होती.
या सुवर्ण मंदिराच्या ठिकाणी बुद्धाने काही काळ वास्तव्य केले असल्याच्या नोंदी सापडतात. हे ठिकाण साधू संतांसाठी ध्यानधारणा करण्यास अतिशय योग्य असल्याचे बुद्धाने म्हटले होते. त्याकाळात या ठिकाणी घनदाट जंगल होते.
२) पाचव्या शीख गुरुंनी या मंदिराची मुहूर्तमेढ रोवली होती.
शिखांचे प्रथम गुरु गुरुनानक यांनी ध्यानधारणा करण्यास याच जागेची निवड केली होती. शिखांचे पाचवे गुरु गुरु अर्जन यांनी श्री हरमंदीर साहिबांचे मंदिर बांधण्यास सुरुवात केली. या मंदिराची रचना कशी असावी याचा आराखडा त्यांनीच तयार केला होता.



