गुन्हा हा गुन्हा असतो. कायद्याप्रमाणे सर्वांनाच शिक्षा होते. सिनेमातला एक प्रसिद्ध डायलॉग आहे, ‘कानून के हात लंबे होते हें...’ अर्थात कायद्यापासून कोणीही पळू शकत नाही. मग या गाढवांची काय बिशाद आहे राव!! आता ती गाढवं जरी असली तरी त्यांनी चोरी केली आहे. असो...
तर भाऊ, झालं असं की उत्तर प्रदेशच्या उरई जेलमध्ये काही झाडे लावायची होती. ही झाडे जेलच्या बाहेरच्या आवारात ठेवण्यात आली होती. थोड्याच दिवसात ती जेलमध्ये लावण्यात येणार होती. पण बाहेर फिरणाऱ्या ८ गाढवांनी ती सगळी झाडे खाऊन फस्त केली. आता ही झाडे काही हजार दहा हजारची नव्हती, त्यासाठी तब्बल ५,००,००० रुपये मोजावे लागले होते. एवढं मोठं नुकसान झाल्यावर युपीच्या पोलिसांनी गाढवांनाच ताब्यात घेतलं. अश्या प्रकारे गाढवांची स्वारी जेल मध्ये पोहोचली.
आठही गाढवांना उरई जेलमध्ये ४ दिवस ठेवण्यात आलं होतं. या गाढवांच्या मालकाने विनंती करून आपल्या गाढवांना सोडवून आणलं आहे. कालच त्यांची सुटका करण्यात झाली. मंडळी, या घटनेने अनेकांना बुचकळ्यात पाडलंय. कोणत्या कायद्यानुसार गाढवांना जेल मध्ये टाकलं? असा एक सवाल विचारला जातोय. तर काही जण कायद्यालाच गाढव म्हणतायत. काहीही असलं तरी ही केस विचित्रच आहे.
मंडळी, शेवटी एक प्रश्न पडला की नक्की गाढव कोण ?
