भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स आहे? मग या देशांत फिरवा गाडी सुसाट..

लिस्टिकल
भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स आहे?  मग या देशांत फिरवा गाडी सुसाट..

सहसा आपण परदेशात प्रवास करतो तेव्हा तिथं प्रवास करताना लोकल बस, ट्रेन असा सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय निवडतो.  पण जर समजा परदेशांतल्या लोण्यासारख्या मस्त गुळगुळीत आणि तितक्याच नेत्रसुख देणाऱ्या रस्त्यांवर तुम्हाला गाडी ड्राईव्ह करता आली आणि तेही आपल्या भारतीय ड्रायविंग लायसन्सवर... तर?

हो, हे शक्य आहे. तुम्हांला माहित आहे का, की आपलं हे भारतीय ड्रायविंग लायसन्स हे बऱ्याचश्या परदेशात चालतं??  माहित नसेल तर हरकत नाही. आज आम्ही घेऊन आलोय ९ अशा देशांची यादी, जिथे फिरताना तुम्हाला फक्त एखादी गाडी भाड्याने घेऊन स्वतः ड्राईव्ह करत अफलातून सफरीवर निघता येईल. 

१. युनिटेड स्टेट्स ऑफ अमेरिका

१. युनिटेड स्टेट्स ऑफ अमेरिका

अमेरिकेतल्या जवळपास सगळ्याच राज्यांत आपण आपल्या भारतीय ड्राइविंग लायसन्सवर १ वर्षाच्या मुदतीपर्यंत गाडी चालवू शकतो. हां, पण  त्यानंतर मात्र तुम्हाला तिथलं ड्राइविंग लायसेन्स घेणं गरजेचं आहे. १ वर्षाच्या मुदतीत तिथं गाडी चालवताना मात्र सोबत आय-९४ हा फॉर्म ठेवावा लागेल. या फॉर्मवरून तुम्ही US मध्ये कधी दाखल झालात ते कळतं आणि त्यावरून एक वर्षाचा कालावधी कधी संपतो हे ही कळतं.

२.जर्मनी

२.जर्मनी

जर्मनीत अमेरिकेसारखा आय-९४ सारखा फॉर्म जवळ ठेवावा लागत नाही. तिथं फक्त तुमचं भारतीय ड्राइविंग लायसेन्स गाडी चालवण्यासाठी पुरेसं आहे. पण लोचा असा आहे की  ते फक्त ६च महिने चालतं. त्यानंतर जर्मनीचं लायसन्स काढायला लागेल.

३. साऊथ आफ्रिका

३. साऊथ आफ्रिका

साऊथ आफ्रिका कोणत्याही देशातल्या वैध ड्राइविंग लायसेन्सला मान्यता देते. फक्त त्यावर  ज्याच्या नावाचं लायसेन्स आहे त्याचा फोटो व सही असली पाहिजे आणि ते ड्राइविंग लायसेन्स इंग्लिशमध्ये असलं पाहिजे . पण जर का तुम्ही तेथे गाडी भाड्याने देण्याऱ्या कंपनीत कामाला असाल तर मात्र आंतरराष्ट्रीय ड्रायविंग लायसेन्सची विचारणा केली जाते .

४. ग्रेट ब्रिटन

४. ग्रेट ब्रिटन

तुम्ही ग्रेट ब्रिटनच्या  म्हणजेच इंग्लंड,स्कॉटलंड आणि वेल्सच्या रस्त्यांवरही गाडी चालवू शकता, तेही एका वर्षाच्या मुदतीसाठी.  तुम्हाला फक्त तुमच्यासोबत तुमचा भारतीय पासपोर्ट ठेवायचा आहे. अर्थात तिथं तुम्हाला सगळीच वाहनं चालवता येत नाहीत.  तिथल्या काही नियमांमुळे फक्त हलकी वाहनं आणि मोटार सायकल चालवण्याची परवानगी दिली जाते.

५.ऑस्ट्रेलिया

५.ऑस्ट्रेलिया

तुम्ही तुमच्या भारतीय ड्राइविंग लायसेन्सवर ऑस्ट्रेलियातल्या न्यू साऊथ वेल्स, क्वीन्सलँड, साऊथ ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियच्या राजधानीच्या आसपासच्या एरियात गाडी चालवू शकता. भारतात आपल्या लायसन्सवर टू-व्हीलर , फोर-व्हीलरसाठी असं लिहिलेलं असतं. त्याप्रमाणे तिथं तुम्ही तीच वाहने चालवू शकता ज्याची तुम्हांला भारतीय ड्राइविंग लायसेन्स मध्ये मान्यता आहे. याशिवाय  उत्तर ऑस्ट्रेलियादेखील  ३ महिने भारतीय ड्राइविंग लायसेन्सवर गाडी चालवण्याची परवानगी देतो .

६.फ्रान्स

६.फ्रान्स

फ्रान्समध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या भारतीय ड्रायविंग लायसेन्सचा पुरेपूर वापर करून घेऊ शकता.  त्यासाठी तुम्हाला ड्रायविंग लायसेन्सचा फ्रेंच अनुवाद सोबत ठेवावा लागेल. इथंसुद्धा गाडी चालवण्यासाठी १ वर्षाचीच परवानगी दिली जाते.

७. नॉर्वे

७. नॉर्वे

तुमचं भारतीय ड्राइविंग लायसेन्स नॉर्वेमध्ये गाडी चालवण्यासाठी ३ महिने वैध असते. मात्र तिथं तुमचं आंतरराष्ट्रीय ड्राइविंग लायसेन्स सोबत ठेवण्याचा सल्ला तेथे दिला जातो. अर्थात ते कंपल्सरी नाही , पण जवळ असलेलं केव्हाही चांगलंच नाही का?

८.स्वित्झर्लंड

८.स्वित्झर्लंड

स्वित्झर्लंडमधल्या रस्त्यावरूनदेखील तुम्ही स्विस आल्प्सच्या नयनरम्य दृश्याचा आनंद घेऊ शकता.  त्यासाठी तुम्हाला फक्त तुमचं भारतीय ड्रायविंग लायसन्स जवळ बाळगायचंय. त्यानंतर मग पूर्ण वर्षभर स्वित्झर्लंडमध्ये ड्रायविंगचा आनंद तुम्ही लुटू शकता.

९.न्यूझीलंड

९.न्यूझीलंड

तुमच्या भारतीय वाहन चालक परवान्यावर न्यूझीलंड तुम्हाला एक वर्षासाठी गाडी चालवण्याची परवानगी देतं. त्यासाठी तुम्हाला न्यूझीलंडच्या वाहतूक एजन्सी किंवा एखाद्या मान्यताप्राप्त ट्रान्सलेटरकडून तुमच्या वाहन चालक परवान्यांचा अनुवाद करून घ्यायचा आहे. गाडी भाड्यावर घेण्यासाठी तुम्ही वयाची २१ वर्ष पूर्ण केलेली असावी  ही एकच अट इथं आहे.

 

या नऊ देशांत आपल्या भारतातलं ड्र्रायव्हिंग लायसन्स चालत असलं तरी अमेरिका आणि इतर युरोपीय देशांत रस्त्याच्या उजव्या बाजूला गाडी चालवली जाते. त्यामुळे थोडे दिवस आधी प्रॅक्टिस करावी लागेल हो..