मेहनतीला पर्याय नसतो हे कितीही म्हटले जात असले तरी मेहनतीने कमावणारे सगळेच असतात असे नाही. पण बसून खाणे हेही अनेकांच्या मनाला पटत नाही. मग वय जास्त असले तरी मेहनत करून कमावणारे काही लोक आपल्या बघण्यात येत असतात. नागपूर येथील एक वयस्कर जोडपं असेच एक मोठे उदाहरण आहे.
नागपूर म्हटले म्हणजे तर्री पोहे हमखास डोळ्यासमोर येतात. नागपूरला गेलात तर तर्री पोह्याचे स्टॉल्स अनेक ठिकाणी दिसतात. फूड व्लॉगर विवेक आणि आयेशा यांनी या वयस्कर जोडप्याचा व्हिडिओ समोर आणला आहे.
नागपूर येथे तांडापेठ भागात पंडित नेहरु कॉन्व्हेंटजवळ हा तर्री पोह्याचा स्टॉल आहे. गेली ५ वर्ष हे दाम्पत्य आपला उदरनिर्वाह या स्टॉलच्या माध्यमातून करत आहेत. त्यांच्याकडे १० रुपये प्लेट तर्री पोहे तर १५ रुपये प्लेट आलू बोन्डा मिळतो. वय झाले असले तरी त्यांचा उत्साह मोठा असल्याचे हा व्हिडिओ बघून नक्कीच जाणवते.
या दाम्पत्याचा दिवस पहाटेच सुरू होतो. स्टॉलसाठी सर्व तयारी पूर्ण करून सकाळी सहा वाजता त्यांचा स्टॉल लागलेलाही असतो. या स्टॉलवर त्या आजी पोहे तयार करताना आनंदी चेहरा ठेऊन वागतात हे बघून अनेकांची मरगळ आपोआप झटकली जाते.
या जोडप्याचा या वयात स्वाभिमानाने जगण्याचा आणि उत्साहाने काम करण्याचा हा स्वभाव पाहता त्यांचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. त्यांचे अनुकरण केल्यास अनेकांचे अनेक प्रश्न सुटण्यास मदत होईल असेच मत व्यक्त केले जात आहे.
उदय पाटील
