सोशल मिडीया बंद झालं तर? विचार केलात कधी? एखादे दिवस कंटाळून आपण त्यापासून दूर जरूर राहतो, पण त्यावर बंदीच आणली तर! हे सत्यात येऊ शकते २६मे म्हणजे अगदी उद्यापासून. २६ मे पासून फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter) आणि इंस्टाग्राम (Instagram) या दिगग्ज कंपन्यांवर भारतात बंदी येऊ शकते. सोशल मिडीया तसेच डिजिटल प्लॅटफॉर्मवरील कंटेंटवर कुणाचंच नियंत्रण नाही. याबाबत अनेक तक्रारी येत असतात. कुणीही कुठलीही पोस्ट करून सामाजिक वातावरण बिघडवू शकते. अनेक अफवा, प्रक्षोभक गोष्टी यातूनच पसरत असतात म्हणून यासाठी काही नियम आहेत. ते पाळले न गेल्यानेच ही कारवाई होत आहे.
उद्यापासून फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम भारतात बंद होणार? या व्हायरल बातमीमागचं सत्य जाणून घ्या!!


२५ फेब्रुवारी २०२१ला भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने (MEITY) सोशल मीडिया कंपन्यांना ३ महिन्यांच्या आत काही सूचनांचे पालन करण्याचे आदेश दिले होते. त्याची मुदत २६ मे ला संपत आहे. आतापर्यंत या कंपन्यांनी सरकारने सांगितलेल्या नियमांचे पालन केलेले नाही. त्यामुळे आता Facebook, Twitter आणि Instagram हे तिन्ही सोशल मिडीया प्लॅटफॉर्म्स भारतात २ दिवसांनंतर बंद होऊ शकतात. ट्विटरला पर्याय म्हणून 'कू' (Koo) या स्वदेशी बनावटीच्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मने या नियमांचे पालन करण्यास सुरुवात केली आहे. परंतु फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामसारख्या अनेक सोशल मिडीया प्लॅटफॉर्म्सने नवीन नियमांची अंमलबजावणी केलेली नाहीये. त्यामुळे यांच्यावर कठोर कारवाई होऊ शकते.

सरकारी आदेशानुसार सोशल मिडीया कंपन्यांना भारतात अनुपालन अधिकारी नियुक्त करण्यास सांगितले होते. तसेच हे सर्व अधिकारी भारतात असणे गरजेचे आहे. तक्रार आल्यानंतर ती १५ दिवसांच्या आत सोडवली गेली पाहीजे. सोशल मिडीया कंपन्यांना आक्षेपार्ह पोस्टचा फर्स्ट ओरिजिनेटर म्हणजे मूळ पोस्टकर्तां कोण आहे, ते सांगावं लागेल. हा प्रकार कुणी सुरू केला हेही सांगावं लागेल. ते भारताबाहेरून सुरू झालं असेल तर भारतात ते कुणी सुरू केलं हे सांगावं लागेल. हे आदेश फक्त सोशल मिडीयाला नाहीत, तर नेटफ्लिक्स आणि अमझोन प्राईम यासारख्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सनाही लागू आहेत. सोशल मिडीयावरील अश्लीलतेला आळा घालण्यासाठी, माहिलांवरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांविरोधात तसेच कोणाची बदनामी करण्यासाठी केलेल्या पोस्ट, लहान मुलांचे पॉर्न कंटेंट यावर आता नवीन नियमांनुसार आळा बसणार आहे.
आता ३ महिने सपंतील पण सोशल मिडीया प्लॅटफॉर्म्सनी या नियमांच्या अंमलबजावणीसाठी सहा महिन्यांचा वेळ मागितला आहे. सरकार अजून ३ महिन्यांची मुदत देणार की २६ मे पासून यांच्यावर बंदी आणणार? तुम्हाला काय वाटते?
लेखिका: शीतल दरंदळे