गेल्या वर्ष दीड वर्षापासून संपूर्ण जग कोरोना महामारीच्या विळख्यात सापडलेलं आहे. जवळपास प्रत्येक देशाला हे ग्रहण लागलं आहे. सर्व देश यातून वाचण्यासाठी आपापल्या परीने धडपड करत आहेत, बहुतेक ठिकाणी वॅक्सिनेशनही मोठ्या प्रमाणावर सुरू झालंय. पण संपूर्ण वॅक्सिनेशन कार्यक्रम राबवून नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढवून कोरोनाचं आव्हान संपुष्टात यायला अजून किमान वर्ष सहा महिने तरी लागतील असा अंदाज आहे. निदान तोपर्यंत तरी आपल्याला प्रतिबंधात्मक उपायांचाच आधार घ्यावा लागणार आहे. वैयक्तिक पातळीवर मास्क, हातांची नियमित स्वच्छता आणि सोशल डिस्टंसिंग ही प्रतिबंधासाठीची त्रिसूत्री सगळ्यांनाच माहिती आहे. तसाच शासकीय पातळीवरचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे चाचण्यांचं प्रमाण वाढवणं आणि जे रुग्ण पॉझिटिव्ह असतील त्यांचं विलगीकरण.
कोरोना चाचण्यांसाठी आरटीपीसीआर, रॅपिड अँटीजेन टेस्ट यासारख्या प्रमाणित चाचण्या तर आहेतच, पण फिनलंड, जर्मनी, भारत, संयुक्त अरब अमिराती यासारख्या देशांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह पेशंट्स डिटेक्ट करण्यासाठी श्वानपथकाचीही मदत घेण्यात येत आहे. या देशांच्या पंगतीत आता अजून एक देश जाऊन बसला आहे, तो म्हणजे थायलंड. आपली वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृती आणि पर्यटनस्थळं यामुळे जगाच्या नकाशावर प्रसिद्ध असलेला हा आग्नेय आशियातला चिमुकला देश. आज मात्र हाही देश कोरोनाच्या वेढ्यात सापडला आहे. कोरोना रूग्णांमध्ये अचानक वाढ झाल्याचे लक्षात आल्यावर थायलंडने टेस्टिंगसाठी श्वानपथकाची मदत घेण्याचं ठरवलं आहे आणि त्यासाठी सहा लॅब्रॅडॉर रिट्रीवर्सचं एक पथक तयार करण्यात आलं आहे.









