थोर थोर व्यक्तींच्या नावासमोर माननीय, सन्माननीय, श्रीमान, असं बिरूद लावण्याची आपली जुनी परंपरा आहे. आता तर एका श्री ने भागात नाही म्हणून काही जणांच्या नावासमोर श्री श्री श्री असंही लिहिण्याची सुरुवात झाली आहे. येत्या काही वर्षात हे श्री पाच वेळा पण म्हटलं जाईल. अमेरिकेत अध्यक्षांना संबोधित करताना मिस्टर प्रेसिडेंट असे म्हणण्याची पद्धत आहे. मिस्टर प्रेसिडेंट हे संबोधन कसे आले याची एक गमतीदार ‘श्टोरी’ आहे.
ही घटना १९ मे १९६२ सालची, त्यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ. केनेडी हे होते. तेव्हा वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आत्ता सारखे फ्लेक्स वगैरे नव्हते, ना फेसबुक होतं, ना इंटरनेट! केनेडींच्या वाढदिवसाचा पुरेपूर फायदा घेऊन पक्षनिधी गोळा करण्यासाठी ‘डेमोक्रेटिक’ पक्षाने १० दिवस अगोदरच एक मेळावा ‘मॅरीसन स्क्वेअर गार्डन’ येथे आयोजित केला होता. अर्थातच जॉन एफ. केनेडी यांची उपस्थिती असणारच होती. पण गर्दी खेचायला हे पुरेसे नव्हते म्हणून ‘मर्लिन मन्रो’ या अभिनेत्रीला एका विशेष कारणासाठी आमंत्रित केले गेले. मादक सौंदर्याचा अॅटम बॉम्ब म्हणून प्रसिद्ध असलेल्या मर्लिनने तेव्हा जे गाणे गायले त्याचे शब्द होते ‘Happy Birthday Mr. President’ आणि तेव्हापासून अमेरिकन राष्ट्रध्यक्षाला मिस्टर प्रेसिडेंट हे संबोधन मिळाले.
या कार्यक्रमाचे आयोजन आणि हे संबोधन केनेडींनी स्वःतच रचलेली माया होती, की त्यांच्या पब्लिसिटी प्रमुखाचा तो खेळ होता ते कळायला मार्ग नाही. मर्लिन त्यावेळी जो ड्रेस घालून आली होती तो ड्रेस आजही जतन करून ठेवण्यात आलेला आहे. मर्लिनचा हा इतका घट्ट होता की तो तिच्या अंगावरच शिवला गेला होता. तिचे या ड्रेसमधले फोटोज आणि हा ड्रेस या कारणासाठीही खूपच गाजले होते.
ते सौंदर्य, ती वेशभूषा आणि ते मिस्टर प्रेसिडेंट संबोधन इतिहासात अजरामर झालेले आहे.





