निळ्याभोर आकाशाशी पाठशिवणीचा खेळ खेळणाऱ्या हिरव्या पर्वतरांगा. या पर्वतरांगाच्या अगदी कड्यावर वसलेले आसाममधले एक गाव हंग्रम!! जेनम, हेमियालोवा अशी छोटी छोटी गावे आजूबाजुला लागून असलेली. धुराच्या लोटांनी डागाळलेली घरे या पर्वतरांगांच्या कुशीत निवांत वसली होती. आपल्या पूर्वापार संस्कृतीवर निष्ठा ठेवून जगणाऱ्या या डोंगरांच्या मुलांना बाहेरची हवा काय असते हे फारसे माहीतही नव्हते. इंग्रजांनी भारतात पाय रोवले आणि ते या डोंगररांगावरही स्वतःचीच सत्ता असल्यासारखे वागू लागले. निसर्गाच्या कुशीत आतापर्यंत निर्धोक जीवन जगलेल्या या नागा जमातीला इंग्रजांची ही अरेरावी अनाकलनीय होती. गेली नऊ वर्षे इंग्रज शिपायांनी विनाकारण या गावांना आणि या जमातीच्या लोकांना आपल्या बंदुकीच्या धाकाने वेठीस धरले होते. कर नाही भरला तर गावातील तरुणांना, मजुरांना धरून नेत होते, त्यांना गुरासारखे मारत होते. त्यांनी धर्मपरिवर्तन केल्यास त्यांची परिस्थिती बदलेल अशी आमिषे दाखवून त्यांना त्यांच्याच संस्कृतीपासून दूर खेचत होते.
हे इंग्रज शिपाई अचानक गावात घुसत गावातील नि:शस्त्र, निष्पाप नागरिकांना मारहाण करत आणि वरून त्यांची पिके आणि घरांना आग लावून जात. अक्षरश: या ब्रिटीश राजवटीत नागा लोकांचे जगणे मुश्कील झाले होते. मणिपूर, आसाम आणि मेघालयच्या परिसरात पसरलेल्या या मुक्तपणे जगणाऱ्या लोकांना इंग्रजांची ही अरेरावी असह्य होत होती. इंग्रजांच्या या अरेरावी विरुद्ध आवाज उठवण्यासाठी त्यांनी हरेका चळवळ सुरु केली. सुरुवातीला फक्त धर्मांतराला विरोध आणि आपल्या नाग संस्कृतीशी एकनिष्ठ राहण्याच्या प्रेरणेतून सुरू झालेली ही चळवळ नंतर संपूर्ण ब्रिटिश विरोधी चळवळीत प्रवर्तित झाली.









