'मिस युनिव्हर्स' स्पर्धा न जिंकताही या भारतीय सौंदर्यवतीचं जगभर कौतुक का होत आहे?

लिस्टिकल
'मिस युनिव्हर्स' स्पर्धा न जिंकताही या भारतीय सौंदर्यवतीचं जगभर कौतुक का होत आहे?

मिस युनिव्हर्स या सौंदर्य स्पर्धेकडे जगभरातले लोक डोळे लावून असतात. मागच्या वर्षी ही स्पर्धा कोरोना महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली होती, त्यामुळे यावर्षी ती आयोजित केली गेली. हे स्पर्धेचे ६९वे वर्ष होते. यंदा मिस युनिव्हर्स बनण्याचा मान मेक्सिकोची एंड्रिया मेजा हिला मिळाला आहे. हे सगळं सविस्तर यासाठी की शेवटच्या पाचमध्ये भारताच्या अ‍ॅडलिन कॅस्टेलिनोचा समावेश होता. तिने भारतात घेण्यात येणाऱ्या 'मिस दिवा युनिव्हर्स २०२०' स्पर्धा जिंकून 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेत आपली एन्ट्री पक्की केली होती. तिने मिस युनिव्हर्सपद मिळवलं नसलं तरी तिच्या यशाचं सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

 

आजच्या लेखातून भारताचे नाव उंचावणाऱ्या अ‍ॅडलिनची ओळख करून घेऊया.

तिचं पूर्ण नाव आहे अ‍ॅडलिन क्वाड्रोस कॅस्टेलिनो. ती अवघ्या २२ वर्षांची आहे. तिचे आईवडील मूळचे कर्नाटकच्या उडुपीचे आहेत, पण कामानिमित्त कुवैतला राहिलेले. तिचा जन्मही कुवैतचाच. वयाच्या १५व्या वर्षी शिक्षण व करियरच्या चांगल्या संधींसाठी ती मुंबईत आली. तिने सेंट झेवियर्स येथून माध्यमिक शिक्षण घेतले. मुंबईच्या विल्सन कॉलेज ऑफ बिझिनेस ऍडमिनिस्ट्रेशनमधून तिने पदवी पूर्ण केली. इंग्रजी हिंदी कन्नड या भाषा ती अस्खलित बोलू शकते. तिची मातृभाषा कोंकणीही तिला बोलता येते.

एवढी मोठी स्पर्धा फक्त शारीरिक सौंदर्यावर जिंकता येते असे नाही, तर सामाजिक कार्यही महत्त्वाचे असते. अ‍ॅडलिनचा त्यातही मोठा सहभाग आहे. तिने एलजीबीटी समुदायाच्या मान्यतेबद्दल जनजागृती सोबत कायदेशीर लढा दिला आहे. महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध तिने आवाज उठवला आहे. तिने PCOS फ्री इंडिया मोहिमेची प्रमुख म्हणून काम केले आहे. महिलांना परवडणारी आरोग्य सेवा देणाऱ्या स्नेह नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेलाही तिने मदत केली आहे. एवढेच नाही तर २०२० मध्ये कोविड -१९ लॉकडाऊनच्या काळात तिने एचआयव्ही संक्रमित मुलांची काळजी घेणाऱ्या डिजायर सोसायटी नावाच्या संस्थेला सढळ हस्ते मदत केली होती. तिने या स्वयंसेवी संस्थेत अन्नपुरवठा, सॅनिटायझर्स आणि फेस मास्क यासारख्या जीवनावश्यक वस्तू पुरवल्या.

अमेरिकेत झालेल्या या सौंदर्यस्पर्धेत अ‍ॅडलिनने 'टॉप ५' मध्ये ब्राझिलची जुलिया गामा, पेरुची जॅनक मसिट यांनाही जोरदार टक्कर दिली. राष्ट्रीय पोशाख फेरीसाठी अ‍ॅडलिनने भारतीय पारंपारिक साडी नेसून सर्वांची मने जिंकली होती. हैदराबादचे डिझायनर श्रावण कुमार यांनी ती डिझाइन केली होती. तिला अभिनयाचीही आवड आहे. पुढच्या काळात ती बॉलिवूडमध्ये दिसली तर आश्चर्य वाटायला नको. 

अ‍ॅडलिनकडे सौंदर्यासोबत सामाजिक जाणीवही आहे. तिने इतक्या कमी वयात केलेले कार्य आणि मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. बोभाटाकडून तिचे खूप खूप अभिनंदन.

 

लेखिका: शीतल दरंदळे