भारताच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा असलेले बिरबल साहनी....त्यांच्या कामाला इंग्रजांनी कसे डावलले?

लिस्टिकल
भारताच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा असलेले बिरबल साहनी....त्यांच्या कामाला इंग्रजांनी कसे डावलले?

आधुनिक भारताच्या जडणघडणीत अनेकांनी हातभार लावला आहे. पण दुर्दैव म्हणजे आजही यापैकी अनेकांची हवी तशी दखल घेतली गेली नाहीय. या यादीतील एक महत्त्वाचे आव म्हणजे डॉ. बिरबल साहनी. डॉ.बिरबल सहानी हे हवामानशास्त्रज्ञ आणि पुरावनस्पतीशास्त्रज्ञ (Paleobotanist) होते. या साहनींनी भारतात पुरावनस्पतीशास्त्राचा पाया रचला. त्यांना राम रुची साहनी या नावानेही ओळखले जाते. ब्रिटीशकालीन भारतातील पहिल्या सुशिक्षित पिढीचे ते प्रतिनिधी होते.

आजच्या लेखातून आम्ही इतिहासातल्या या अज्ञात व्यक्तिमत्वाची ओळख करून देणार आहोत.

१८६३ साली फाळणीपूर्ण पंजाबमध्ये डॉ. बिरबल साहनी यांचा जन्म झाला होता. त्यांचे वडील व्यापारी होते मात्र व्यापारात त्यांना जोराचा फटका बसला आणि कुटुंबाची आर्थिक घडी पूर्णत: विस्कटून गेली. म्हणून बिरबल साहनी यांना काम करत करत स्वतःचे शिक्षण पूर्ण करावे लागले. पंजाब विद्यापीठातून त्यांनी बीए ऑनर्सची पदवी मिळवली. पदवी पूर्ण झाल्यानंतर ते ब्रिटीश कालीन भारतीय हवामान खात्याच्या शिमल्याच्या ऑफिसमध्ये रुजू झाले. त्याकाळी भारतीय हवामान खात्यात काम करणारे ते पहिले आणि एकमेव भारतीय शास्त्रज्ञ होते. ते राजाराममोहन रॉय यांच्या आर्य समाजाचे सदस्यही होते.

हेन्री फ्रान्सिस ब्लॅनफोर्ड या ब्रिटीश हवामानशास्त्रज्ञ आणि पुरावनस्पतीशास्त्रज्ञाचे सहाय्यक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. भारत आणि बर्मा दरम्यान जितके स्टेशन्स असतील तिथून आलेल्या अंदाजानुसार दररोजच्या हवामानाचा अहवाल तयार करण्याचे काम त्यांच्यावर सोपवण्यात आले होते. सुरुवातीला साहनी यांनी तयार केलेल्या अहवालावरून ब्लॅनफोर्ड एक नजर टाकत, त्याची शहानिशा करत आणि मगच ते अहवाल प्रसिद्धीसाठी पाठवत असे. नंतर मात्र त्यांना साहनी यांच्या कामावर विश्वास वाटू लागला आणि ते आलेले अहवाल तसेच पुढे पाठवू लागले.

(हेन्री फ्रान्सिस ब्लॅनफोर्ड)

एकदा साहनी यांच्या अहवालात थोडी चूक झाली तर तेव्हाच्या द पायोनियर वृत्तपत्राच्या प्रकाशकांनी त्यांच्या अहवालात साहनी यांच्यावर ताशेरे ओढले आणि एका स्थानिक शास्त्रज्ञावर इतकी मोठी जबाबदारी टाकणे कसे चुकीचे आहे हेही ऐकवले. अर्थात साहनी यांना याची सवय झाली होती.

१८८५ साली बंगालच्या खाडीत एक मोठे वादळ उठले. आजर्यंत बंगालच्या खाडीत जितकी काही वादळे झालीत त्यातील हे सर्वात मोठे आणि प्रलयंकारी वादळ होते. त्यावर्षीच्या सप्टेंबरमध्ये नेहमीप्रमाणे साहनी आपल्या ऑफिसमध्ये गेले आणि सगळ्या स्टेशन्सवरून त्यांचे हवामान निरीक्षणाचे अहवाल मागवले. सगळ्या स्टेशन्सवरचे अहवाल सामान्य होते पण डायमंड हार्बर स्टेशनवरून आलेल्या अहवालात मात्र हवेतील दाब कमी झाल्याची नोंद होती.

साहनी यांनी तातडीने या हार्बरवरील निरीक्षकाला टेलिग्राम पाठवला आणि त्यांचे ताजे निरीक्षण पाठवण्याची विनंती केली. हे निरीक्षण मिळाल्यानंतर त्यांना खात्री झाली की, पूर्व किनाऱ्यावर मोठे वादळ धडकणार आहे. त्यांनी तिथल्या सदस्यांना आणि शेजारच्या स्टेशनलाही सूचना दिल्या. दर तीस मिनिटांनी तिथल्या हवामानात होणाऱ्या बदलांची नोंद कळवण्याचे आदेश दिले. त्यांचे सगळे वरिष्ठ त्यावेळी कलकत्त्यात होते. तातडीने वादळाची बातमी प्रसिद्ध करणे गरजेचे होते. वरिष्ठांच्या अनुमतीची वाट पाहत राहिले असते तर हजारो लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. त्यांनी तातडीने पूर्ण किनाऱ्यावर फॉल्स पॉइंट नावाचे वादळ धडकणार असल्याची बातमी प्रसिद्ध केली.

किनाऱ्यावर उभी असलेली व्यापारी जहाजे सुरक्षित स्थळी हलवण्यात आली. तरीही या वादळाची तीव्रता इतकी विनाशकारी होती की, यात ५००० लोकांचा बळी गेला. तरीही साहनी यांनी वेळेवर या वादळाचा अचूक अंदाज बांधला असल्याने होणारी हानी थोडीफार तरी टाळता आली.

त्यांनी ब्लॅनफोर्डलाही झाल्या प्रकाराबद्दल कळवले. ब्लॅनफोर्डने तत्काळ अलेक्झांडर पेडलरशी संपर्क केला. पेडलर हा बंगालच्या स्थानिक हवामान खात्याचा रिपोर्टर होता. पण त्याने शिमल्यावरून आलेले रिपोर्ट पाहिलेच नव्हते आणि ते वेळेत प्रसिद्धही केले नाहीत. बंगालच्या खाडीत असे कुठले वादळ आले आहे याची त्याला थोडीशी देखील कल्पना नव्हती. पण इतर स्टेशन्स वरून आलेले अहवाल पाहिले तेव्हा त्यांना कळून चुकले की साहनी यांचा अंदाज एकदम बरोबर आहे. आता वादळाची तीव्रता वाढली होती. साहनी यांनी वेळेतच घेतलेल्या निर्णयामुळे हजारो लोकांचे प्राण वाचले आहेत, हे त्यांनी खाजगीत मान्यही केले.

नंतर पेडलरने ‘फॉल्स पॉइंट सायक्लोन’वर एक शोधनिबंध प्रकाशित केला, पण या शोधनिबंधामध्ये त्याने कुठेही साहनी यांचा आणि त्यांच्या अचूक अंदाजाचा ओझरता देखील उल्लेख केला नाही.

(अलेक्झांडर पेडलर)

आज भारतीय शास्त्रज्ञांचा डंका जगभर वाजत असताना त्याकाळी भारतावर सत्ता गाजवणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी मात्र एका स्थानिक शास्त्रज्ञाचे योगदान धुडकावून लावले होते.

साहनी यांचे योगदान एवढ्यापुरते मर्यादित नाही. त्यांनी वनस्पतींच्या अवशेषांचा अभ्यास करून भारतीय वनस्पतींच्या विकासाचा एक पूर्ण पट आपल्या अभ्यासाद्वारे आणि शास्त्रीय पद्धतीने उलगडून दाखवला. पुरावनस्पतीशास्त्राच्या सर्व पैलूंवर त्यांनी सखोल अभ्यास केला आहे. त्यांनी केलेला हा सगळा अभ्यास त्यांनी संग्रहालयाच्या माध्यमातून जिवंत ठेवला आहे. उत्तरप्रदेशच्या लखनऊ शहरात ‘Birbal Sahni Institute of Palaeosciences’ या नावाने हे संग्रहालय ओळखले जाते. या संग्रहालयात साहनी यांनी देशविदेशात फिरून संग्रहित केलेल्या पुरातन वनस्पतींचे अवशेष आहेत. १९४९ साली तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते या संस्थेची पायाभरणी करण्यात आली होती. आज सुमारे साडेतीन एकर परिसरात हे संग्रहालय उभे आहे.

डॉ. साहनी यांना त्यांच्या हयातीत अनेक पुरस्कार मिळाले. ते दोनदा भारतीय विज्ञान परिषदेचे अध्यक्षही होते. १० एप्रिल १९४९ रोजी हृदयविकारामुळे त्यांचे निधन झाले.

साहनी यांच्या नावाने भारतीय विज्ञान परिषदेद्वारे भारतातील सर्वोत्तम वनस्पती संशोधकांना ‘बीरबल साहनी पदक’ दिले जाते. त्यांच्या विद्यार्थ्यांनी वनस्पतींच्या अनेक नव्या प्रजातींची नावे साहनी यांच्याच नावावरून ठेवली आहेत. बीरबल साहनी आज हयात नसले तरी त्यांच्या या संग्रहाच्या रुपात ते भारतातील वनस्पतीशास्त्र संशोधकांना कायमच प्रेरणा देत राहतील.

 

लेखिका: मेघश्री श्रेष्ठी