चित्ता हा सर्वात जास्त वेगवान समजला जाणारा प्राणी. हा प्राणी आज भारतात अस्तित्वात आहे का असा प्रश्न जर विचारण्यात आला तर कुणीही हो असेच उत्तर देणार, कारण भारतातल्या अनेक राज्यांत बिबट्याला चित्ता याच नावाने ओळखले जाते. पण सत्य मात्र वेगळेच आहे. देशातला शेवटचा चित्ता हा १९४७ सालीच मरण पावला. म्हणजेच देश स्वतंत्र झाला तेव्हापासून देशात चित्ता अस्तित्वात नाही.
१९४७ साली छत्तीसगड येथील कोरीया संस्थानचे राजे रामानुज प्रताप सिंग देव यांनी शेवटच्या चित्त्याची शिकार केली. पुढे पाच वर्षांनी म्हणजे 1952 साली भारताने चित्ता देशातून नामशेष झाल्याचे घोषित केले. पण आता एक चांगली बातमी आली आहे. देशात पुन्हा एकदा वेगवान चित्त्यांचा प्रवेश होणार आहे.



