एलॉन मस्क, बिल गेट्स, जेफ बोझेस... यांच्यात समान काय आहे? तर त्यांनी मिळवलेली अतिप्रचंड संपत्ती. तसे आपल्या भारतातले उद्योगपतीही मागे नाहीत, पण पैशाचा न आटणारा ओघ कुठे असेल तर तो या लोकांकडे. आपण उभ्या केलेल्या साम्राज्याच्या जोरावर ही मंडळी जगातल्या अतिश्रीमंत लोकांच्या यादीमध्ये टॉप पोझिशनला आहेत.
पण पूर्वी हा मान भारतानेही मिळवला आहे हे तुम्हाला माहीत आहे का?
भारताला पूर्वी 'सोने की चिडिया' असं म्हटलं जायचं. होय, भारत सांस्कृतिकदृष्ट्या जितका संपन्न होता, तितकाच भौतिक दृष्ट्याही श्रीमंत होता. मोजता येणार नाही इतकी अफाट संपत्ती असलेली अनेक भारतीय कुटुंबं पूर्वी भारतात नांदत होती. त्यांपैकीच एक म्हणजे जगत शेठ. शेठ कुटुंब जगातल्या सर्वाधिक श्रीमंत कुटुंबांपैकी एक म्हणून गणलं जात होतं. जगत शेठ यांचं मूळ नाव शेठ फतेहचंद होतं. दागदागिन्यांनी मढलेल्या त्यांच्या पोर्ट्रेटवरूनच त्यांच्या ऐश्वर्याची कल्पना येते.
फतेहचंद यांना 'जगत शेठ' ही उपाधी मुगल बादशाह मोहम्मद शाह याने १७२३ मध्ये दिली. त्यानंतर समाजातली त्यांची ओळख बदलली. त्यांच्या कुटुंबाला लोक जगत शेठचं कुटुंब म्हणून ओळखू लागले. अठराव्या शतकाच्या सुरुवातीला बंगालमधल्या अत्यंत श्रीमंत बँकर म्हणून प्रसिद्ध असलेल्या जगत शेठ यांना जगाचे बँकर म्हणून नावलौकिक मिळाला.
या घराण्याचे मूळ पुरुष शेठ माणिकचंद आहेत असा लोकांचा विश्वास आहे. जगत शेठ मेहताब राय यांचे पूर्वज मारवाडचे रहिवासी असल्याचे लोक मानतात. १६५२ मध्ये या कुटुंबातल्या हिरानंद साहू यांनी मारवाड सोडून पाटण्याची वाट धरली.
जगत शेठ यांची श्रीमंती समजण्यासाठी आपल्याला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील. काही उपलब्ध स्रोतांनुसार १७२० च्या सुमारास जगत शेठची संपत्ती ही तत्कालीन ब्रिटिश अर्थव्यवस्थेपेक्षाही अधिक होती. आजच्या हिशोबाने बोलायचं तर त्यांची एकूण मालमत्ता ९९ लाख कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त होती. ब्रिटिश कागदपत्रांनुसार त्या काळच्या सगळ्या ब्रिटिश बँकांमधील संपत्ती एकत्र केली तरी ती संपत्तीदेखील जगत शेठच्या संपत्तीपेक्षा कमीच होती. पण मुळात त्यांच्याकडे एवढी संपत्ती कुठून आली?

