राजस्थान रॉयल्सचा 'रॉयल' कारभार! हैदराबादवर मिळवला एकतर्फी विजय

राजस्थान रॉयल्सचा 'रॉयल' कारभार! हैदराबादवर मिळवला एकतर्फी विजय

केन विलियमसनच्या नेतृत्वाखाली खेळणारा सनरायझर्स हैदराबाद संघ पहिल्यांदाच आयपीएल २०२२ स्पर्धेतील सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. हा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये पार पडला. दरम्यान पहिल्याच सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघातील गोलंदाज आणि फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरल्याचे पाहायला मिळाले आहे. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रात साजेशी कामगिरी करता आली नसल्याने सनरायझर्स हैदराबाद संघाला पराभवाचा सामना करावा लागला. हा सामना सामना राजस्थान रॉयल्स संघाने ६१ धावांनी आपल्या नावावर केला.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, केन विलियमसनने तेच केले होते, जे तो आतापर्यंत करत आला होता. त्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सनरायझर्स हैदराबाद संघाला चांगली सुरुवात मिळाली असती परंतु भुवनेश्वर कुमारने जोस बटलरला बाद केले आणि तो चेंडू नो चेंडू होता. त्यानंतर राजस्थान रॉयल्स संघाने हैदराबादच्या गोलंदाजांवर आक्रमण करायला सुरुवात केली.

राजस्थान रॉयल्स संघासाठी १०० वा सामना खेळत असलेल्या संजू सॅमसनने २५ चेंडूंमध्ये तुफानी अर्धशतक झळकावले. राजस्थान रॉयल्स संघाला २० षटक अखेर ६ गडी बाद २१० धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबाद संघाकडून एडेन मार्करमने ५७ आणि वॉशिंग्टन सुंदरने ४० धावांचे योगदान दिले. तसेच इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे सनरायझर्स हैदराबाद संघाला २० षटक अखेर अवघ्या ७ बाद १४९ धावा करता आल्या.

टॅग्स:

IPL

संबंधित लेख