पाच मिलियन (5M) म्हणजे ५० लाख फॉलोअर्स असणारं ॲडोबी फोटोशॉपचं इंस्टा हँडल जगभरातल्या फक्त २६० जणांना फॉलो करतं. त्यांच्या कामावर लक्ष ठेऊन असतं. या २६० जणांमध्ये इशान कसकाय हे जाणून घेणं फारच इंटरेस्टिंग आहे. अवकाशाविषयी एका ठराविक वयात मुलांना आकर्षण वाटतं यात काही नवल नाही. तिथल्या गुढतेविषयी आणि चमत्कारिक घटनांविषयी त्यांना आकर्षण वाटणं अगदीच साहजिक आहे. इशानलासुद्धा हे आकर्षण सतत जाणवायचं. अवकाश विज्ञानाविषयी (स्पेस सायन्सविषयी) उत्सुकता मात्र होती. त्याच्याविषयी जाणून घेण्याची जिज्ञासा होती. जे काही करेन ते अवकाशविज्ञानाशी सबंधीतच असं त्याने मनोमन ठरवून टाकलं होतं. यातून तो स्पेस आर्टवर्क करू लागला.
सुरुवातीला यासाठी तो स्टॉक इमेजेस वापरायचा. नंतर मग इंटरनेटवर असतील त्या इमेजेस वापरून आर्टवर्क करणं त्याला कंटाळवाणं वाटू लागलं. म्हणून मग तो स्वतःची अशी वेगळी स्टाईल डेव्हलप करण्याच्या मागे लागला. त्यातून एक भन्नाट कल्पना त्याला सुचली. त्याच्या स्वतःच्या मालकीच्या 'डमी स्पेससूट' ची!! या स्पेससूटचा वापर करून त्याला हवं तसं फोटोशूट तो करू शकेल. आता हा स्पेससूट रेडिमेड घेणं म्हणजे फार खर्चिक काम होतं. मग इशानने स्वतःच तो सूट तयार करण्याचं ठरवलं. त्यासाठी वेगवेगळे युट्युब व्हडिओ पाहात त्याने आपलं पहिलं आर्टवर्क डिझाईन केलं, अगदी तसाच स्पेससूट डिझाईन केला. त्यासाठी तो स्वतः शिवणकाम शिकला. स्पेस हेल्मेट तयार केलं. असं करत करत तो हळूहळू त्याची कल्पना सत्यात उतरवण्याचा दिशेने पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागला.
बंगळुरूला सध्या तो ज्या घरात राहतो त्या घरात त्याने स्टुडिओ सेटअप तयार केला. थ्री पॉईंट लायटिंग सेटअप उभारला. एक बेसिक फिचर असणारा कॅमेरा, ट्रायपॉड, ग्लव्हज, हेल्मेट आणि स्पेससूट सगळी तयारी तर झाली. आता प्रश्न होता फोटो काढणार कोण? आणि कुणाचे? मग इशान स्वतःच अंतराळवीराच्या अवतारात तयार झाला. टायमर लावून स्वत:च स्वतःचे फोटो काढायचे असं त्याने ठरवून टाकलं. आता गंमत अशी की ग्लव्हज घालून कॅमेरा हँडल करणं महाकठीण काम. मग इशानने ग्लव्हज घालण्याची प्रॅक्टिस केली. आता तो अवघ्या काही सेकंदात ग्लव्हज घालू शकतो. टायमर लावून अवघ्या दहा सेकंदात ग्लव्हज घालून, मार्क केलेल्या जागेवर, मनात ठरवलेली पोज देत तो फ्रेममध्ये जातो.
या ठिकाणी तुम्ही रोज तयारी कशी करता हे जरा आठवून पाहा. तुम्हाला सँडल पायात सरकवायला, घड्याळाचा बेल्ट लावायला, गेला बाजार शर्टची बटणं लावायला किती वेळ लागतो? आता इशान फोटोसाठी ज्या सगळ्या गोष्टी अवघ्या दहा सेकंदात करतो, त्या करताना किती कॉन्सनट्रेशन, पेशन्स आणि प्रॅक्टिस लागत असेल याचा विचार करून पाहा. आपला साधा एक सेल्फी नीट येत नाही म्हणून आपली चिडचिड होते, कित्येकदा तर तो काढत असताना आपलं टायमिंग ही चुकतं. हातात ग्लव्हज, डोक्यावर ते भलंमोठं काचेचं हेल्मेट, अंगातला दहा किलो वजनाचा स्पेससूट हे सगळं सांभाळत, स्वतःचं स्वतःचा फोटो काढणं किती अवघड असेल, फक्त एकदा कल्पना करून पाहा! आता ही गोष्ट खरी, की पहिलाच क्लिक काही परफेक्ट येत नाही. त्यासाठी इशानला कधीकधी तीन-तीन तास प्रयत्न करावे लागतात. एवढं सगळं करूनही त्याच्या हाती लागते ती एक रॉ इमेज. या रॉ इमेजवर पुढे फोटोशॉपमध्ये तो प्रोसेसिंग करतो. असा एक रॉ फोटो म्हणजे त्याची एक कन्सेप्ट.
इशान फोटोशॉपमध्ये जेव्हा रॉ फोटोवर काम करायला घेतो, तेव्हा आधी तर हव्या त्या बॅकग्राउंडवर तो कटिंग केलेला फोटो ठेवतो. त्याला हवं ते भवताल तयार करण्यासाठी लेयरवर काम करतो. मग एक नीट इमेज तयार होते. लिहिलंय तेवढं सोपं हे मुळीच नाही. हेल्मेटमध्ये आलेलं इतर वस्तूंचं रिफ्लेक्शन काढून टाकणं, मुळात फोटोत ते येऊच न देणं, एक काल्पनिक जग सॉफ्टवेअरचा वापर करून फोटोत उभारणं हे किती कौशल्याचं काम आहे. ते करण्यासाठी टेक्निकली किती हुशार असायला हवं हे जाणकार नक्कीच समजू शकतील. हेच जाणून ॲडॉबीने इशानचं तोंडभर कौतुक केलंय. इशान ही जी प्रोसेस फॉलो करतो, त्याचं जर एखादा मोठा ब्रँड कौतुक करत असेल इशानच्या आर्टवर्कचा अंतिम परिणाम किती नेटका, आकर्षक व सुरेख असेल!