'मी लोखंडासाठी सोने दिले' : देशासाठी या देशाच्या स्त्रियांनी सोन्याचा मोह सोडला आणि बदल्यात लोखंडी दागिने घेतले!

'मी लोखंडासाठी सोने दिले' : देशासाठी या देशाच्या स्त्रियांनी सोन्याचा मोह सोडला आणि बदल्यात लोखंडी दागिने घेतले!

सणासुदीला किंवा मुहूर्ताला सोन्याचे दागिने किंवा नाणी फक्त आवड म्हणूनच नाही, तर गुंतवणूक म्हणूनही घेतले जातात. अडीअडचणीला सोन्याचे दागिने मोडून किंवा गहाण ठेवून गरज भागवली जाते. सोनं कितीही महाग असलं तरी भारतीयांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. पण तुम्हाला माहिती आहे का, फक्त भारतातच नाही तर इतर अनेक देश आहेत जिथे सोन्याला खूप भाव आहे. होय! पण आज आम्ही अशा एका देशाची कहाणी सांगत आहोत ज्या देशवासीयांनी देशासाठी सोन्याचा मोह सोडून लोखंडी दागिने घातले.

ही ऐतिहासिक घटना प्रशियामध्ये घडली होती. १७०१ ते १९१८ या कालावधीत अस्तित्वात असलेला प्रशिया हा सध्याच्या जर्मनीतला मोठा महत्त्वाचा देश होता. फ्रान्स त्याचा शेजारी देश. १९ व्या शतकात प्रशियाचे फ्रान्सशी युद्ध सुरू होते. कुठल्याही देशासाठी युद्ध करायचे म्हणजे खूप मोठे आर्थिक साहाय्य लागते. अनेक शस्त्रास्त्रे लागतात. घोडे, हत्ती अशा अनेक खर्चिक गोष्टी लागतात. प्रशियाला युद्धासाठी आर्थिक तरतूद करावी लागणार होती. त्यावेळी
प्रशियाच्या राजकुमारीने सर्व श्रीमंत आणि खानदानी स्त्रियांना निधी देण्यासाठी आवाहन केले. त्यांनी सोन्याचे दागिने दान करण्यासाठी राजकुमारीने आवाहन केले आणि त्या बदल्यात त्यांना लोखंडी कडे देण्यात आले. या कड्यांवर “Gold gab ich für Eisen” (“मी लोखंडासाठी सोने दिले”) असा शिक्का मारला होता.

देशासाठी अनेकजणी पुढे आल्या. त्यांनी आपले सोन्याचे दागिने देऊन लोखंडी कडे घेतले. हे लोखंडी दागिने खूप आदराने पाहिले गेले. त्यांची ओळख सोन्यापेक्षाही खूप उच्च समजली गेली. लोखंडी प्रतिकृती असणे म्हणजे देशभक्त अशी ओळख निर्माण झाली. सामाजिक कार्यक्रमांमध्ये सोन्यापेक्षा जास्त मौल्यवान शिक्का असलेले लोखंडी दागिने मिरवले गेले.

विशेष म्हणजे आजही ते दुर्मिळ दागिने eBay या शॉपिंग साईट वर हजारो रुपयात विकले जातात. हे लोखंडी दागिने परिधान करणे अभिमानाचे समजले जाते. युद्ध करणारा सैनिक शरीरावरच्या जखमा जशा अभिमानाने दाखवतो तसाच अनुभव हे लोखंडी दागिने देत असतील का?

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातही अनेक स्त्रियांनी आपले दागिने देशाकरता दिले. अर्थात तेव्हा बदल्यात काही द्यावे-घ्यावे अशी कुणाची परिस्थिती आणि मानसिकताही नव्हती. प्रभातफेरीत किंवा जनजागृती फेरीत ओळखदेख नसलेल्या पण स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या देशबांधवांकडे अंगावरचे अनमोल दागिने काढून देणाऱ्या महिलांचा आपला देश ऋणी आहे. आज त्यांच्याकडे आणि त्यांच्या कुटुंबाकडे या प्रसंगाची आठवण म्हणून एखादी वस्तू नसेल, पण देशप्रेमाची ज्योत आजही तितकीच प्रखर असेल!!

शीतल दरंदळे