खरं म्हणजे जानेवारी २०२० मध्ये जेव्हा करोना बाल्यावस्थेत होता तेव्हाच त्याचे पाय पाळण्यात दिसू लागले होते. नव्हे, तो हातपाय चांगलेच पसरणार हे लक्षात यायला लागलं होतं. या धडपड्या व्हायरसला आवर घालण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू झाले होते. मोलनुपिरावीर नावाची छोटीशी गोळी त्यावेळी कोणाच्या खिजगणतीतही नव्हती. आज मात्र हीच कॅप्सूल या लढाईत बिनीचा शिलेदार बनली आहे. भारत सरकारने हे औषध आणि अजून दोन लसी यांना नुकतीच परवानगी दिली आहे. तेव्हा आज बघू या छोट्याशा गोळीची गोष्ट.
मुळात अँटीव्हायरल्स म्हणजे विषाणूंना रोखणारी औषधं बनवणं ही किचकट प्रक्रिया. याचं कारण म्हणजे विषाणूंच्या पृष्ठभागावरली स्पाईक प्रोटीन्स. अहो, या स्पाईक्सच्या मदतीनंच तर ते पेशींना चिकटतात. या पेशींनी नुसतं बोट धरायला दिलं की हे विषाणू थेट खांद्यावरच चढून बसतात! इथून पुढे त्यांचं पुनरुत्पादन म्हणजे आवृत्त्या काढणं सुरू होतं. या आवृत्त्या काढण्याच्या क्रियेतच अडथळा आणता आला की काम फत्ते. अँटीव्हायरल्स हेच काम करतात. पण असं औषध विकसित करणं साधंसोपं नव्हे. म्हणूनच मोलनुपिरावीर खास आहे.
सुरुवातीला या गोळीच्या माणसांवर चाचण्या करण्यात आल्या नव्हत्या. एक अंदाज असाही होता की माणसांना या गोळीचा डोस जास्त प्रमाणात द्यावा लागेल आणि ते कदाचित विषारी ठरू शकेल. पण वेन हॉलमन या माणसाचं अंतर्मन वेगळं सांगत होतं. त्याने हे मोलनुपिरावीर नावाचं अँटीव्हायरल ड्रग विकसित केलं होतं आणि दोन प्रकारच्या कोरोना विषाणूंशी लढण्यासाठी ते प्रभावी असल्याचं सिद्ध केलं होतं. तेच नॉव्हेल करोना विषाणूशी पण लढेल असा त्याला विश्वास होता. या सगळ्यात त्याच्याबरोबर होती त्याची पत्नी वेंडी हॉलमन. या दोघांनी मिळून रिजबॅक बायोथेराप्युटिक्स नावाची एक कंपनी स्थापन केली होती आणि या माध्यमातून या औषधाचा परवाना मिळवला होता. मोलनुपिरावीर हे या कंपनीचं उत्पादन. या औषधाला डेन्मार्क, युके यासारख्या देशांनी हायरिस्क गटातल्या रुग्णांसाठी उपचार म्हणून या गोळीला मान्यता दिली. भारतातही नुकतीच या औषधाला मान्यता मिळाली आहे. संशोधकांच्या दाव्यानुसार लक्षणं दिसू लागल्यापासून पाच दिवसांच्या आत ही गोळी घ्यायला सुरुवात केली तर हॉस्पिटलायझेशन किंवा गंभीर आजार यांची शक्यता कमी होईल.


