मुंबईला लागूनच असणाऱ्या आत्ताच्या पालघर व पूर्वीच्या ठाणे जिल्ह्यात केळवे व माहीम हि ऐतिहासिक गावे वसलेली आहेत. या दोन्ही गावांना खूप मोठा इतिहास आहे. तर आज आपण या लेखातून उत्तर कोकणातल्या या केळवे व माहीमचा संपूर्ण परिसराचा इतिहास नेमका काय आहे व आज तेथे पाहण्यासारख्या कोणत्या गोष्टी आहेत हे जाणून घेऊ. चला तर मग आजच्या केळवे - माहीम च्या सफारीला सुरुवात करूया.
भारताच्या पश्चिम किनारपट्टीला प्राचीन काळापासून अनन्यसाधारण महत्त्व लाभले आहे. हे महत्त्व लाभण्यामागे व्यापार व त्यासाठी असणाऱ्या बंदरांना पूरक अशी भौगोलिक, सामाजिक, राजकीय स्थिती इ. गोष्टी कारणीभूत आहेत. याच भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर भडोच, सोपारा, चौल, कल्याण, श्रीस्थानक म्हणजेच आजचे ठाणे इत्यादी महत्त्वाच्या नैसर्गिक बंदरांना व्यापारासाठी अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले होते. कारण याच बंदरांमधून अतिशय मोकळ्या व सुरक्षित वातावरणात भारताचा जगाशी व्यापार होत असे. या बंदरांना संरक्षण देण्यासाठी पश्चिम किनारपट्टीवर म्हणजेच गुजरातमधील खंबातच्या आखातापासून ते केरळ- कन्याकुमारीपर्यंत समुद्रात व समुद्रतीरावर दुर्गांची एक शृंखला राज्यकर्त्यांकडून निर्माण केली गेली. यामागील मुख्य उद्देश असा कि, हा संपूर्ण व्यापार ज्या समुद्रमार्गे होत असे तेथील सर्व लहान-मोठ्या बंदरांना व प्रजेला या दुर्गांच्या माध्यमातून सुरक्षा पुरविणे असा होता.


