नाटकाला किंवा सिनेमाला गेल्यानंतर कुणाचं तरी कार्टं नेमकं आपल्याच कानाशी किंचाळत असतं, शेजारच्या बायकांना नेमकं तेव्हाच गॉसिप करायचं असतं आणि शेजारच्या तरूणाला सोबतच्या मुलीला आपण किती हुशार आणि स्मार्ट आहोत हे दाखवण्यासाठी म्हणून कुठल्यातरी फोनचे टेक्निकल फिचर्स सांगायचे असतात. अशा वेळेला आपण बहुतेकदा त्यांना गप्प बसायला सांगतो.
पुण्याच्या एका बाईनं शेजारचं मूल आरडाओरडा करत आहे हे पाहून मध्यंतराची वेळ साधून त्या मुलाच्या आईबाबाला तेच सांगितलं. पण परिणाम काय झाला माहित आहे? त्या आईबाबानेच या बाईशी उलट भांडण काढलं. उलट तक्रार करणार्या बाईचा दारू पिऊन नको तिथे हात लावतो आहे म्हणून गोंधळ घातला. प्रकरण इथंच थांबलं नाही. स्वत:च्या मुलाला गप्प न ठेवू शकणार्या या आईबाबांनी चक्क पोलिसांनाच थेटरात बोलावलं. नशीबाने त्या मुलाची आई आणि हिचा नवरा यांच्यामध्ये दोन लोक बसले होते आणि ते थेटरातल्या इतर लोकांनी मान्यही केलं म्हणून प्रकरण निभावलं.
हे घडलं पुण्यातल्या सीझन मॉलमधल्या सिनेपोलिसमध्ये. २०११मध्ये हडसन नदीत विमान उतरवल्याच्या घटनेवरचा ’सली’ सिनेमा खरंतर A रेटेड म्हणजेच फक्त प्रौढांसाठी आहे. असं असताना लोक बिनदिक्कत आपल्या मुलांना तिथं घेऊन जातात. अर्थातच अशा सिनेमांत लहान मुलं बोअर होतात आणि दंगा घालतात.
अर्थात लहान मुलांना अशा सिनेमांना येऊ देणार्या सिनेमागृहांपेक्षा इतक्या लहानग्यांना तिथं नेणारं पब्लिक यासाठी जास्त जबाबदार आहे. लोक तर ’उडता पंजाब’लाहे एवढ्या तेवढ्या मुलांना घेऊन जातात. असो. इथून पुढं लोकांकडे बघून त्यांना शांत करता येईल की नाही हे आधी निरखून पाहावं आणि नंतरच मग अशांसोबत भांडण काढावं.
