सरकार आणि आयकर विभाग लपवलेला इन्कम जाहीर करा म्हणून जाहिराती करत आहे. पण तरीही बरेच लोक त्यांचा इन्कम जाहिर करताना दिसत नाहीत. म्हणून इन्कम टॅक्स विभागानं अशा लोकांवर छापे घालून त्यांची खरी कमाई बाहेर काढायचं ठरवलंय. घाटकोपरच्या खाऊगल्लीतला छापा त्यामुळेच पडला.
मुंबईत काही ठिकाणच्या खाऊगल्ल्या खूप फेमस आहेत. घाटकोपरची खाऊगल्ली त्यातली एक. पास्ता, पाणीपुरी, सॅंडविचेस, गोळा, फ्रँकी, फळं यासोबतच एकाच वेळी ७-८ तवे लावलेला डोसावालाही खूप प्रसिद्ध आहे. तो म्हणे ४५ वेगवेगळ्या प्रकारचे डोसे बनवतो. त्यांचं डोसे बनवण्याचं कसबही पाहण्यासारखं असतं. एखादा डोसा अगदी १५०-२०० रूपयांपर्यंतही जातो. एखादं कुटुंब किंवा मित्र-मैत्रिणींचा घोळका आला की हजार रूपये सहज खर्च होतात. एकतर फूटपाथ नव्हे, चक्क रस्त्यावरचा धंदा, स्वस्त कच्चा माल आणि सर्व्हिस टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स असे कुठलेच टॅक्सेस नाहीत. त्यामुळं सगळा इन्कम मालकाच्या खिशात!!
कसा पडला छापा:
गुजराती मिड-डेच्या म्हणण्यानुसार, आयकर विभागाचे अधिकारी या डोसा सेंटरवर एक आठवडाभर नजर ठेऊन होते. सर्वाधिक गजबजलेल्या स्टॉल्समधला हा एक स्टॉल, पदार्थांचे दर, हे सगळं बघता त्यांना या माणसाची कमाई भरपूर असणार हे कळलं. छापा टाकला तेव्हा त्यांना ६०,०००रूपये गल्ल्यात सापडले, पण या डोसा सेंटरची कमाई याहूनही अधिक असण्याची त्यांना शंका आहे. काल लगेच व्हॉट्सऍपवर या सेंटरचा मालक गुजराती आहे , त्याची महिन्याची कमाई एक करोड रूपये आहे आणि त्याचे घाटकोपरमध्ये ८ फ्लॅटस आहेत असे मेसेजेस फिरू लागले होते. खरंतर या डोसासेंटरचा मालक विजय रेड्डी आहे आणि मिड-डेच्या माहितीनुसार तो एका झोपडपट्टीत राहतो. खरंखोटं हळूहळू चौकशीत बाहेर येईलच, पण मुंबईत वडापाव, पावभाजी आणि खाऊगल्लीतल्या दुकानदारांची कमाई भरपूर असणार यात काही शंका नाही.
इन्कम टॅक्स विभागानं लोहारचाळीतले लाईटिंगचे दुकानदार आणि झवेरीबाजारतल्या सराफांवर पण असे छापे टाकले आहेत. एकदा महिन्याला सुमारे ७५,०००रूपये भीक मिळवणार्या भिकार्याची बातमी चर्चेत होती. त्यामुळे त्यांच्यावरही छापे टाकायचा विचार आयकर विभागानं केला तरी आश्चर्य वाटायला नको.
