आतापर्यंत तुमची व्हाट्सअॅप, वायबर, हाईक, लाईन अशी वेगवेगळी इन्स्टंट मेसेजींग अॅप्स वापरून झाली असतील तर आता आणखी एक नवा मेसेंजर ट्राय करून बघा. गुगलने आज लॉन्च केलेला Allo मेसेंजर...
आजच प्ले स्टोअर वर उपलब्ध झालेला हा Allo मेसेंजर व्हाट्सअॅपपेक्षा बराच वेगळा आहे. यामध्ये एकदा तुमचा नंबर व्हेरिफाय झाला की झालं तुमचं अकाउंट सुरू. यात गुगलने अनेक नवीन कस्टम स्टिकर्स आणि इमोजी-म्हणजेच शुद्ध मराठीत स्माईलीज- दिलेल्या आहेत ज्यांना आपण हवं तेवढं लहानमोठं बनवू शकतो. अक्षरांचा आकार लहानमोठा बनवू शकतो आणि हवंतर एखाद्या फोटोवर लिहून तो पुढे शेअरही करू शकतो. सोबतीला तुमच्या प्रायव्हसीसाठी इनकॉग्निटो मोड, एन्ड टू एन्ड एनस्क्रिप्शन सारख्या सुविधा आहेतच.
मग पाहूयात गुगल आयो (Allo)ची महत्वाची फीचर्स-
स्मार्ट रिप्लाय -
स्मार्ट रिप्लायच्या वैशिष्ट्यामुळं एखाद्या मेसेजला तुम्ही त्वरित योग्य उत्तर देऊ शकता. यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स असल्याने आलेला मेसेज ओळखून तुम्हाला काय रिप्लाय द्यायचाय ते हे अॅपच तात्काळ ओळखेल. म्हणजे समजा तुम्हाला एखाद्याने लहान बाळाचा फोटो पाठवला.. तर तुम्हाला लगेच 'क्युट' असा रिप्लाय द्यायचं सजेशन येईल. अशी अनेक उत्तरं यात आधीच तयार आहेत.
गुगल असिस्टंट -
गुगल असिस्टंट हे या अॅपमधली खास गोष्ट आहे. कारण इथे तुम्हाला पाहायला मिळतील ताज्या बातम्या, गेम्स, हवामान आणि खेळांचे लाईव्ह स्कोअर्स. सोबतच इथे तुमच्यासोबत गप्पा मारण्यासाठी गुगलचा चॅटबॉट पण असेल. चॅटबॉट हा एक कम्प्युटरमधला प्रोग्राम असतो, जो तुमच्याशी एखाद्या माणसाप्रमाणे गप्पा मारू शकतो. जर हाईक मेसेंजर तुम्ही वापरला असेल, तर तिथे नताशा नावाचा चॅटबॉट तुम्ही पाहिला असेलच. हे गुगल असिस्टंट फीचर वापरण्यासाठी मात्र मेसेंजरला तुमचं जीमेल अकाउंट कनेक्ट करणं गरजेचं आहे.
गुगलच्या सर्च इंजिनचा वापर करून हे अॅप अजून स्मार्ट होऊ शकतं. वापरायला अत्यंत सुटसुटीत असलेला हा Allo मेसेंजर एकदा इन्स्टॉल करून वापरून बघाच. अजूनतरी आपले संदेश सर्वरवरती साठवून ठेवले जाणार नाहीत असं गुगलचं म्हणणं आहे. पण या इंटरनेटच्या मायाजालात आपल्या पाऊलखुणा कुठे ना कुठे रेकॉर्ड होत राहतात, त्यामुळे सावध असलेलं नेहमीच बरं!!
