तुम्हाला भारतात स्वित्झर्लंडची मजा अनुभवायचीय?
मग तर तुमची इच्छा भारतीय रेल्वेखात्यानं मनावर घेतलेली दिसतेय. भारतीय रेल्वे म्हटलं की माणसांच्या प्रचंड गर्दीनं गजबजलेली, लांबलचक आणि चहुबाजूंनी बंदिस्त डब्यांची अशी ट्रेन आपल्या डोळ्यांसमोर येते. पण आता मात्र आपल्या डोळ्यांसमोरचं हे चित्र बदलायला काही हरकत नाही.
कारण सध्या आपल्या रेल्वे खात्यानं ट्रेनला वेगळा लूक व प्रवाश्यांना आरामदायी सेवा पुरवण्याचं काम हाती घेतलंय . स्वित्झर्लंडच्या ट्रेनप्रमाणं वरचं छत पूर्ण काचेचं असलेल्या रेल्वेगाड्या सुरू करण्याचा विचार आता भारतातही होतोय . प्रवाशांची संख्या वाढावी व त्यांना त्रास होऊ नये हा या मागचा हेतू! भारतीय रेल्वेच्या आखणीनुसार येत्या डिसेंबरपासून अशा लक्झरी ट्रेनची टेस्ट काश्मिर आणि दक्षिण भारतातल्या अराकू या विभागात होणार आहे.
पण हा ग्लास टॅlप सिलिंग्सचा प्रयोग भलताच महागडा आहे! एका सिलिंगचे ४ करोड याप्रमाणं हा संपूर्ण उपक्रम पार पाडण्यासाठी भारतीय रेल्वेला तब्बल १.२१ लाख करोड इतका खर्च येण्याची संभाव्यता आहे. यापूर्वीही १०० स्टेशनवर फुकट वाय-फायच्या सुविधेसारखे उपक्रम भारतीय रेल्वेने पार पाडले. पण भारतातलं हवामान आणि तापतं ऊन, बाहेरची स्वच्छता, हे सगळं पाहून अशी रेल्वे खरंच गरजेची आहे का? आणि आता एवढे सगळे पैसे खर्च करुन फक्त काहीश्या ग्लास सिलिंग्सने भारतीय रेल्वे प्रवास खरंच सुखाचा होईल का? हा विचार करण्याजोगा विषय मात्र भारतीय रेल्वेने सगळ्यांच्या पुढ्यात मांडून ठेवलाय , एवढं मात्र नक्की!
