साईड बर्थवाल्यांचा त्रास आता मिटणार....रेल्वे विभागाने आणलाय हा रामबाण उपाय !!

लिस्टिकल
साईड बर्थवाल्यांचा त्रास आता मिटणार....रेल्वे विभागाने आणलाय हा रामबाण उपाय !!

रेल्वेने कधी रात्रीचा प्रवास करायची वेळ आली आणि आपल्याला अगदी हव्या त्या बर्थचं रिझर्वेशन मिळालं आहे असं तुमच्या बाबतीत किती वेळा झालंय? बहुतेक जणांची पसंती अर्थातच लोअर बर्थला असते. पण आपले ग्रह नेहमीच इतके अनुकूल नसतात आणि अशा वेळी वाट्याला येतो तो साईड बर्थ. काहीजणांना हा साईड बर्थ बरा वाटत असला तरी तो सगळ्यांनाच मानवत नाही हं! विशेषकरून उंची जास्त किंवा शरीरयष्टी धिप्पाड असलेल्यांसाठी हा बर्थ मिळणं म्हणजे सजा-ए-कालापानीच जणू! ना धड नीट बसता येत ना झोपता. जोडीला ट्रेनमधून फिरणारे फेरीवाले, प्रत्येक स्टेशनवर चढणारे आणि उतरणारे प्रवासी, त्यांचे सामानाचे मोठमोठे डाग या सगळ्याचा त्रासही सहन करावा लागतो.  

या त्रासाचा क्लायमॅक्स गाठला जातो तो रात्री झोपण्यासाठी आडवं झाल्यावर. इतका वेळ ज्याला आपण पाठ टेकलेली असते तो पृष्ठभाग झोपायच्या वेळी आडवा पाडला जातो आणि त्याला समोरचा तसाच अजून एक येऊन मिळतो. जिथे हे दोन बॅक सरफेसेस एकत्र येतात तिथे नेहमीच एक छोटी फट राहते आणि सगळ्या त्रासाचं मूळ इथे असतं. ही फट रात्रभर बोचते. जोडीला दोन्ही बॅक्स समपातळीत नसतील तर हा त्रास अजूनच वाढतो. झोप तर हिरावली जातेच पण अनेकांना कंबर, पाठ दुखण्याचाही त्रास होतो. 

त्यावर उपाय म्हणून आता रेल्वेने एक नामी डिझाईन विकसित केलंय. वास्तविक ही आयडिया इतकी साधीसोपी आहे की इतके दिवस हे कुणालाच कसं सुचलं नाही असा प्रश्न पडावा. यात काय केलंय तर या दोन्ही बॅक्स एकमेकांसमोर ठेवल्यावर त्याच्यावर अजून एक अखंड असा बर्थ अंथरला जातो. एरवी हा बर्थ सीट आणि खिडकी यांच्यामध्ये असलेल्या फटीत ठेवलेला असतो. त्याला सुटकेसच्या हॅन्डलसारखं एक हॅन्डल असतं ज्याच्या मदतीने त्याला वर ओढता येतं. एकच सलग आणि अखंड पृष्ठभाग असल्याने यांच्यात ना कुठे खालीवर पातळी ना टोचणाऱ्या फटी. फक्त तो आधीच्या बॅक्सवर टाकायचा आणि निवांत आडवं व्हायचं. 

हा बर्थ आरामदायी तर आहेच शिवाय त्याची रुंदीही जास्त आहे असा रेल्वेचा दावा आहे. त्यामुळे आता साईड बर्थ मिळाला तरी झोपेचं टेन्शन नाही. 

काही महिन्यांपूर्वीच रेल्वेने नॉन एसी सलीपर कोच आणि जनरल क्लासचे कोच अपग्रेड करण्याची घोषणा केली होती. सर्वसामान्य प्रवाशांचा रेल्वे प्रवास सुखद आणि आरामशीर व्हावा यासाठी भारतीय रेल्वे अनारक्षित जनरल क्लासच्या डब्यांना नवीन स्वरूप बहाल करत आहे. हे डबे आणि ३ टायर नॉन एसी स्लीपर क्लासचे डबे आता एसी होणार आहेत. त्यामुळे आता स्वस्त नि मस्त एसीचा गारेगार प्रवास सामान्यांच्याही आवाक्यात येणार आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीप्रमाणे अपग्रेडेड स्लीपर क्लास आता इकॉनॉमिकल एसी ३ टायर क्लास असेल आणि तो एसी ३ टायर टुरिस्ट क्लास म्हणून ओळखला जाईल. पहिल्या टप्प्यात असे २३० कोच निर्माण करण्याचं रेल्वेचं नियोजन आहे. 

चला, रेल्वे तर हळूहळू कात टाकतेय. आता फक्त प्रवासी याला कसा आणि कितपत प्रतिसाद देतात ते पाहायचं.

 

लेखिका: स्मिता जोगळेकर