महाराष्ट्रातलं पहिलं मराठी चर्च कोणतं माहीत आहे? वाचा तिथं घडलेला एक वादग्रस्त किस्सा..

महाराष्ट्रातलं पहिलं मराठी चर्च कोणतं माहीत आहे? वाचा तिथं घडलेला एक वादग्रस्त किस्सा..

पंच हौद मिशन या पहिल्यावहिल्या मराठी चर्चची स्थापना करण्यात निळकंठ शास्त्री गोरे आणि रेव्हरंड नारायण वामन टिळक यांचा मोठा सहभाग होता. ह्या दोन्ही विद्वानांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता. या चर्चच्या शिलान्यासावरचा मजकूर शुध्द संस्कृत भाषेत आहे.  १९ व्या शतकाच्या शेवटच्या दशकात एक जुना वाडा विकत घेऊन बांधण्यात आलेलं हे पंच हौद मिशन चर्च पुण्यातल्या नव-ख्रिस्ती संस्कृतीचा ठेवा आहे.  पण इतिहासात मात्र  पंच हौद मिशन एक विवादास्पद  प्रकरण  म्हणून प्रसिध्द आहे!

पुण्यातल्या  गोपाळ जोशी या गृहस्थानी १४ ऑक्टोबर १८९० साली पंच हौद मिशनमध्ये  एक सभा आयोजीत केली होती. हे गृहस्थ विक्षिप्त तऱ्हेवाईक मिश्किल खोडकर पण अत्यंत बुध्दिमान म्हणून ओळखले जायचे. हे गोपाळ जोशी म्हणजे डॉ आनंदीबाई जोशी यांचे पती! एकदा ह्यांनी गाढवाचे सार्वजनिक लग्न आयोजित केले होते. 

या दरम्यान  age of consent (संमतीचे वय ) या कायद्याची चर्चा पुण्यात गरम होती.   गोपाळरावांनी  या कार्यक्रमात कर्मठ आणि सुधारक दोन्ही पक्षांना बोलावले होते. न्यायमूर्ती रानडे, ग. वि. कानिटकर, गोपाळ कृष्ण गोखले हे सुधारक, तर लोकमान्य टिळक, वि. के. राजवाडे कर्मठ लोकांच्या बाजूने आले होते. एकूण ५२ जणांची उपस्थिती या कार्यक्रमात होती. कार्यक्रमाच्या शेवटी सगळ्यांनी  चहा बिस्किटाचा आस्वाद घेतला आणि इथेच एक वादाची ठिणगी पडली! बिस्कीटं आणि चहा म्हणजे धर्म बुडालाच!

पुण्याच्या कर्मठांनी टिळकांवर आगपाखड करायला सुरुवात केली आणि हिंदू धर्मातून बहिष्कृत करण्याची मागणी करायला सुरुवात झाली. महादेव गोविंद रानडे सुधारक होते. पण हिंदू धर्माच्या बाहेर पडण्याच्या कल्पनेने ते पण घाबरले. 

उलट सुलट चर्चेला इतके उधाण आले की शेवटी शंकराचार्यांना हस्तक्षेप करण्याची विनंती करण्यात आली. इथे एक नवा तिढा निर्माण झाला. गोपाळ कृष्ण गोखले यांनी हस्तक्षेप करणारे शंकराचार्य कोण असा प्रश्न उभा केला. टिळकांनी मी वाराणसीला जाऊन प्रायश्चित्त घेतले आहे असे सांगितले.  महादेव गोविंद रानडे सुरुवातीला त्यांच्या भूमिकेवर ठाम होते पण वर्षभरात त्यांचाही धीर सुटला.

नंतरच्या काही वर्ष हा वाद असाच चालला आणि संपला. पुण्यातल्या विद्वानाना नंतर नविन विषय मिळाला आणि पंच हौद प्रकरण संपलं!

आज जवळजवळ १२५ वर्षांनी  सोशल मिडीॆयावर अशाच चर्चा सुरु आहेत. हम नही सुधरेंगे हेच खरे !!