भारतीय रेल्वे ही भारतीय सीमांतर्गत येणारी सर्व रेल्वे स्थानकं चालवते. म्हणजे ज्या कोणत्याही स्टेशनला रेल्वे थांबते तिथला संपूर्ण खर्च आणि देखभाल भारतीय रेल्वे डिपार्टमेंट स्वतः करते. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की देशात असे एक रेल्वे स्थानक आहे, जे भारतीय रेल्वे नाही तर गावातील लोक चालवतात. या रेल्वे स्थानकाची संपूर्ण जबाबदारी ग्रामस्थांच्या हाती आहे. हे रेल्वे स्टेशन गावकरी का चालवतात, यामागे एक मनोरंजक कारण आहे! जे आम्ही तुम्हाला या लेखात सांगणार आहोत.
राजस्थानच्या नागौरचे जालसू नानक रेल्वे स्थानक हे देशातील पहिले असे रेल्वे स्थानक आहे, जेथे कोणीही रेल्वे अधिकारी किंवा कर्मचारी नाही.. हे अनोखे रेल्वे स्टेशन राजस्थानमध्ये आहे आणि नागौर जिल्ह्यापासून सुमारे ८२ किमी अंतरावर आहे. दर महिन्याला इथले गावकरी लोक पैसे जमा करून सुमारे १५०० तिकिटे खरेदी करतात.
२००५ पासून हे रेल्वेस्थानक गावकरी चालवत आहेत. कारण तेव्हाच भारतीय रेल्वेने हे स्टेशन बंद करण्याचा निर्णय घेतला होता. तसे पाहिले तर या स्थानकावर भारतीय रेल्वेला दरमहा ३० हजार रुपयांचे उत्पन्नही मिळत आहे. येथे १० हून अधिक गाड्या थांबतात. हे स्थानक बंद करण्यामागे महत्वाचे कारण होते रेल्वे विभागातली कमी महसूल असलेली स्थानके बंद करण्याचे रेल्वेचे धोरण. त्यानुसार २००५ साली हे स्टेशन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु गावकऱ्यांनी त्याला विरोध केला. त्यासाठी त्यांनी ११ दिवस धरणे धरले.

