आज आपण ज्या युट्यूबरची गोष्ट वाचणार आहात त्या भावाचे आज वय आहे २७ वर्षं!! आजच्या तारखेला त्याच्या चॅनेलवर विविध क्षेत्रातील दिग्गज जसे गौरगोपाल दास, ए. आर. रहमान, प्रियंका चोप्रा, सैफ अली खान, सुधा मूर्ती, जय शेट्टी असे मोठे लोक येऊन गेले आहेत. एका युट्यूब चॅनेलपासून सुरुवात करणाऱ्या या युअवकाचे आज अर्धा डझन युट्यूब चॅनेल्स् आहेत. डिजिटल मार्केटिंग कंपनी आहे, यातून तो कोट्यावधींची उलाढाल करतो. रणवीर अलाहाबादिया असे या पठ्ठ्याचे नाव आहे. बियर बायसेप्स असे त्याच्या मुख्य चॅनेलचे नाव आहे.
रणवीरचे आडनाव अलाहाबादिया असले तरी त्याचा जन्म २ जून १९९३ रोजी मुंबई येथे झाला होता. सधन घरातला मुलगा, साहजिकच शिक्षणासाठेवे काही संघर्ष वगैरे त्याला करावा लागला नाही. बारावीनंतर इतर अनेक मुलांप्रमाणे तोही इंजिनिअरिंगला गेला. मात्र इंजिनिअरिंग करताना बऱ्याच मुलांना जे दिवस बघावे लागतात, तेच त्याच्याही वाट्याला आले.
पहिल्याच वर्षी भाऊ बेसिक इंजिनिअरिंगसारख्या विषयात नापास झाला. मग दारूचे व्यसन लागले. त्यात दुष्काळात तेरावा महिना म्हणजे ब्रेक-अप झाले. सर्व नातेवाईकांची मुले चांगली प्रगती करत असल्याने त्याच्यावर मोठा दबाव आला. अशा सर्व परिस्थितीत तो अतिशय निराश झाला. तो दिवसेंदिवस निराशेच्या गर्तेत ढकलला गेला.
तरुण वयात एकामागे एक अपयश आले तर माणूस जास्तच वाईट विचार करतो. त्याच्या मानत आत्महत्येचे विचार यायला लागले. पण त्याच्या आईवडिलांनी त्याला समजून घेतले. आयुष्य या सर्व गोष्टींपेक्षा खुप मोठे आहे हे त्याला त्यांनी समजावून दिले. या काळात त्याला एक चांगली सवय लागली ती म्हणजे व्यायामाची. व्यायामामुळे त्याची दारू सुटली आणि त्याचे मन एकाग्र व्हायला लागले.

