फॅमिली मॅन सारख्या मालीका बघताना मनात एक विचार घोळत असतो तो असा की खरोखर अशा पेट्या भरभरून शस्त्रं कशी आणत असतील?? विमानाचे सुटे भाग करून ते परत जोडणं ही फक्त कल्पना आहे की खरंच तसं घडतं? एकाचवेळी दोन अतिरेकी गट एकत्र येतात का? किडनॅपींग करून हवं ते साध्य करण्याचा प्रयत्न अतिरेकी कसे करतात? या सर्व प्रश्नांचे उत्तर असे आहे की होय, हे सगळे असेच चालत असते. आपण या बातम्या तुकड्यांत वाचत असतो. या बातम्या जोडल्या तर वर्षभरात तुम्हीही सहज फॅमिली मॅनसारखे कथानक लिहू शकाल.
आज जी सत्यकथा तुमच्या समोर आम्ही सादर करणार आहोत त्यातही असेच घडले आहे. सरहद्दीच्या पलीकडून येणारा शस्त्रांचा साठा - कलकत्यातील एका धनिकाचे अपहरण- आणि त्यातून मिळालेल्या पैशाचा ९/११ हल्ल्यासोबत असलेला थेट संबंध-कलकत्त्यातल्या अमेरीकन वकिलातीवर हल्ला -आणि शेवटी यामागे असलेल्या सूत्रधाराचा आखातीदेशातून मिळवलेला ताबा - हे सगळे एकत्र सांगणारी ही कथा आहे. कथेची सुरुवात होते पाकीस्तानलगत असलेल्या गुजरातच्या सरहद्दीपासून!
प्रत्येक गुन्हेगारीच्या प्रकरणात एक साखळी असते. या साखळीचा दुहेरी उपयोग असतो. जर गुन्हा उघडकीस आला तर बर्याच वेळा मुद्देमाल जप्त होण्यापलीकडे नुकसान होत नाही. दुसरा फायदा असा की गुन्ह्यामागे असलेल्या सूत्रधाराला गायब होण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. अर्थातच या कारणांचा पुरेपूर अभ्यास शोध करणार्या एजन्सीने केलेला असतो. त्यांच्याकडेही यावर उतारा उपलब्ध असतो.



