आयपीएल २०२२ स्पर्धा(Indian premier league 2022) सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेसाठी सर्व संघ कसून सराव करताना दिसून येत आहेत. स्पर्धेतील पहिली लढत कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata knight riders) आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai super kings) या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. आगामी हंगामात कोणता संघ जेतेपद मिळवणार याबाबत अनेक दिग्गजांनी भविष्यवाणी करायला सुरुवात केली आहे. दरम्यान भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil gavaskar) यांनी देखील कोणता संघ जेतेपद मिळवणार याबाबत भविष्यवाणी केली आहे.
आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत ८ संघ खेळत होते. परंतु आगामी हंगामात एकूण १० संघ जेतेपद मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे चाहत्यांचे दुप्पट मनोरंजन होणार आहे. दरम्यान सुनील गावस्कर यांच्या मते, रिषभ पंतच्या (Rushabh pant) नेतृत्वाखाली खेळणारा दिल्ली कॅपिटल्स (Delhi capitals) संघ जेतेपद पटकावू शकतो.
गेल्या दोन हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाने अप्रतिम कामगिरी केली आहे. आयपीएल २०२० स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. अंतिम सामन्यात या संघाला मुंबई इंडियन्स (Mumbai indians) संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. तर गतवर्षी या संघाला प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यास यश आले होते. परंतु १४ हंगाम उलटूनही या संघाला जेतेपद मिळवता आले नाहीये. आता सुनील गावस्करांना असे वाटत आहे की, आगामी हंगामात हा संघ जेतेपदाला गवसणी घालू शकतो.
स्पोर्ट्स तक सोबत बोलताना सुनील गावस्कर म्हणाले की, "गतवर्षी कर्णधार म्हणून मिळालेला अनुभव रिषभ पंतला या हंगामात कामी येईल. तो गेल्या दीड वर्षापासून भारतीय संघासाठी खेळतोय. तसेच तो चांगल्या फॉर्ममध्ये देखील आहे. ज्याचा फायदा त्याला आयपीएल स्पर्धेत होईल. तसेच त्याचा संघ देखील मजबूत संघ आहे. त्यामुळे नक्कीच तो जेतेपदावर नाव कोरण्यासाठी प्रबळ दावेदार आहे."




