महाराष्ट्र हे इतर क्षेत्रांबरोबर क्रिकेटमध्येही दिग्गज घडवणारे राज्य आहे. सचिन, गावस्कर तसेच इतरही अनेक दिग्गज महाराष्ट्राने दिले. बॉलिंगमध्ये झहिर खानसारखा तुफान बॉलर महाराष्ट्राने देशाला दिला आहे. सध्या असाच एक मराठी खेळाडू सईद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये अक्षरशः धुमाकूळ घालत आहे.
अक्षय कर्णेवार असे या खेळाडूचे नाव आहे. यवतमाळ जिल्ह्यातील एका खेडेगावातून आलेला हा सर्वसामान्य घरातला तरुण आहे. सईद मुश्ताक अली ही T-20 सामन्यांची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील स्पर्धा असते. यात तो विदर्भ संघाकडून खेळत आहे. सोमवारी आणि मंगळवारी विदर्भ संघाचे अनुक्रमे मणिपूर आणि सिक्कीमसोबत सामने झाले. मणिपूर विरुद्ध बॉलिंग करण्यासाठी आलेल्या अक्षयने आपल्या स्पिन बॉलिंगवर खेळाडूंना लीलया नाचवले.


