कैरीचे पन्हे :- यही हे राईट चॉईस बेबी

कैरीचे पन्हे :- यही हे राईट चॉईस बेबी

कैरीचं पन्हं : पन्हं कधीही , म्हणजे अगदी उन्हाळ्यात सुध्दा उठसूठ प्यायचे  नसते . आता बाजारात बारा महीने कैर्‍या मिळतात म्हणून करण्याचा हा प्रकार नव्हे. आणि हा सिंथेटीक सरबतासारखा उठवळ आयटमही नव्हे. पण पन्ह्याची कृतीसुध्दा पाल्हाळीक नसावी.  चला बनवू या उत्तम पन्हे.

पन्हं म्हणजे कच्च्या कैरीचे की कैर्‍या उकडून ? असा आगाऊ प्रश्न विचाराणार्‍या माणसाला पन्ह्याच्या कार्यक्रमातून आधीच कटाप करावे. पन्हे म्हणजे उकडलेल्या कैर्‍यांचेच !!

पन्ह्यासाठी आधी कैरीचे वय बघावे. अगदीच बालिकाबधू कैर्‍या टाळाव्यात. पोटात घट्ट कोय धरलेल्या साधारण पोक्त कैर्‍या निवडून घ्याव्यात. शेपूच्या वासाची बाधा असलेल्या कैर्‍या आधी टाळाव्यात.आमच्याकडे /आम्ही हापूसची कैरी उकडूनच पन्हं बनवतो असे म्हणणार्‍या लोकांकडे पन्हं पिऊ नये. त्यांच्या पन्ह्याला एक बावळट वास येतो. मुंबईतलं सर्वोत्तम पन्हं एकेकाळी फोर्टात खादी भांडारात मिळायचं. माडाचा गूळ वापरून केलेल्या पन्ह्याची चव पुन्हा कधीच चाखायला मिळाली नाही . पण सरकारी असल्याने हे पन्हं काही वर्षानी मिळेनासं झालं. आता माड्गूळ फक्त मिळतो. कधीतरी उत्साहाच्या भरात माडगूळ घेऊ आणि तेव्हा घरी कैर्‍या असतील आणि गृहिणी नाक न मुरडता माडगूळ वापरेल हे जरा कठीणच आहे.

त्यातल्या त्यात बोरा बाजारात असलेल्या बेडेकरांच्या दुकानात हवं तसं पन्हं फक्त चैत्रातच प्यायला मिळतं. दुपारी दीडच्या दरम्यान हे पन्हं प्यायला जावं. उत्तम पन्ह्यासोबत ब्यांक , सरकारी हापीसातल्या पुरंध्र्यांची गर्दी हा एक बोनस आहे. बेडेकर त्याचे वेगळे पैसे घेत नाहीत.

याखेरीज मान्यताप्राप्त अ‍ॅडीशन म्हणजे वेलचीची पूड.  वेलचीचा तोरा नाकापेक्षा मोती जड व्हावा इतकी वेलची वापरू नये. आणि अगदीच जास्त वेलची घातली तर ती शेवटीच्या पातेल्याच्या तलातल्या गाळातच जाते. केशर वापरणे म्हणजे कैरीसमोर सुबत्तेचा ठुमका मारण्यासारखे आहे.

टॅग्स:

kairee panhesummersarbat

संबंधित लेख