'मार्क बेमाउन्ट' या पठ्ठ्यानं तब्बल ७९ दिवसात संपूर्ण जगाची सफर केली आहे राव. पूर्वीचा रेकॉर्ड हा १२३ दिवसांचा होता पण या बहाद्दराने ४४ दिवसाआधीच हा रेकॉर्ड तोडलाय. भौ, मानलं याला !!
तब्बल २८,९६८ किलोमीटरचा हा प्रवास होता. मंडळी हे अंतर इतक्या कमी दिवसात पार करण्यासाठी मार्कला सतत १६ तास सायकल चालवावी लागली. तो रात्री फक्त ५ तास झोपायचा, सकाळी ४ वाजता त्याचा प्रवास सुरु व्हायचा. हा प्रवास शारीरिक आणि मानसिकरीत्या खूप ‘चॅलेंजिंग’ असल्याचं तो म्हणतो.
मार्कने २ जुलै रोजी पॅरिसमधून आपल्या प्रवासाला सुरुवात केली. युरोप, रशिया, मंगोलिया, चायना, त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधून त्याने थेट उत्तर अमेरिकेतून पोर्तुगाल, स्पेन आणि मग फ्रांस असा प्रवास पूर्ण केला.
"माझ्या मनासाठी आणि शरीरासाठी हे खूप मोठं आवाहन होतं" असं मार्क म्हणतो. विविध प्रदेश आणि तिकडचं बदलतं हवामान आणि त्यात सतत प्रवास करणे ही सोप्पी गोष्ट नव्हती. अश्या कामांसाठी लागणारा संयम, जिद्द आणि चिकाटी त्याच्या अंगी ठासून भरली आहे. यात शंकाच नाही. या त्याच्या कामगिरीने त्याने २ गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपलं नाव कोरलं आहे.
मार्कने या आधी पूर्ण स्कॉटलंडचा प्रवास एका दिवसात पूर्ण केला होता. त्यानंतर २२ वर्षांनी त्याने संपूर्ण जगाचा प्रवास केला.


