कोणतेही युग असो, रहस्य किंवा गूढकथा हा वाचकांचा सर्वात लोकप्रिय प्रकार आहे. कोणतीही गूढ गोष्ट, मग ती एखाद्या दूरच्या देशाची गोष्ट असो किंवा आपल्या दैनंदिन जीवनात घडणारी असो, तिच्याबद्दल प्रचंड उत्सुकता असते. अशाच एका गूढ तलावाची गोष्ट आज आम्ही सांगणार आहोत. हा तलाव आपल्या भारतातच अरुणाल प्रदेशमध्ये आहे.
या रहस्यमयी तलावाचे नाव नावांग यांग (Nawang Yang lake) असे आहे. पण याला 'लेक ऑफ नो रिटर्न' या नावानेही ओळखले जाते. हा तलाव अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर चांगलांग जिल्ह्यात आहे. तसं पाहायचं तर 'लेक ऑफ नो रिटर्न' तलाव म्यानमारच्या सीमेवरील एक लहान शहर असलेल्या पानसौच्या क्षेत्राखालीही येतो. इथे बहुतांश टांगस जमातीचे लोक राहतात.
असे म्हणतात की दुसऱ्या जागतिक युद्धाच्यावेळी अमेरिकेच्या पायलटांनी त्यांचे विमान इथे जमीन सपाट असेल असे समजून आपत्कालीन लँडिंग केले होते. मात्र, त्यानंतर ते विमान आणि पायलटस सगळेच रहस्यमयरित्या गायब झाले होते. ते पुन्हा कधीच सापडले नाहीत. हे युद्ध संपल्यानंतर जपानी सैन्य या रस्त्याने तलावाकडून परत जात होते. ते देखील या तलावाजवळ येऊन रस्ता चुकले आणि गायब झाले. काही लोकांच्या म्हणण्यानुसार त्यांना मलेरिया झाला होता त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. पण सत्य काय आहे हे आजपर्यंत समजले नाही.

