आयपीएल (ipl) २०२२ स्पर्धेतील ७ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपरजायंट्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्स संघाने ६ गडी राखून जोरदार विजय मिळवला. हा लखनऊ सुपरजायंट्स संघाचा या हंगामातील पहिला विजय आहे. पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने लखनऊ सुपरजायंट्स संघाला पराभूत केले होते. तर चेन्नई सुपर किंग्ज संघाचा या हंगामातील हा सलग दुसरा पराभव आहे. पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने चेन्नई सुपर किंग्ज संघावर ६ गडी राखून विजय मिळवला होता.
या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर लखनऊ सुपरजायंट्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून प्रथम फलंदाजी करताना रॉबिन उथप्पाने तुफानी अर्धशतकी खेळी केली. त्याने २७ चेंडूंमध्ये ५० धावांची खेळी केली. तर शिवम दुबेने ४९ धावांचे योगदान दिले. तसेच या हंगामातील पहिलाच सामना खेळत असलेल्या मोईन अलीने ३५ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. या खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्ज संघाला २० षटक अखेर ७ बाद २१० धावा करण्यात यश आले होते.
चेन्नई सुपर किंग्ज संघाने दिलेल्या २११ धावांचा पाठलाग करताना,लखनऊ सुपरजायंट्स संघाकडून सलामीवीर फलंदाज केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक यांनी चांगली सुरुवात करून दिली होती. क्विंटन डी कॉकने या डावात सर्वाधिक ६१ धावांची खेळी केली. तर एविन लुईसने ५५ आणि केएल राहुलने ४० धावांचे योगदान दिले. हा सामना लखनऊ सुपरजायंट्स संघाने ६ गडी राखून आपल्या नावावर केला.




