दोनशे वर्षांपूर्वी जन्मलेल्या या संशोधकाचे हे ६ उपकार आपण आजही मानतो...

लिस्टिकल
दोनशे वर्षांपूर्वी जन्मलेल्या या संशोधकाचे हे ६ उपकार आपण आजही मानतो...

मंडळी, जंतू, जंतूसंसर्ग, जंतूनाशक हे शब्द अस्तित्वातही नव्हते त्या काळात चार संशोधकांनी आपल्या अथक परिश्रमाने आणि संशोधनाने मानव समाजाला जीवघेण्या आजारातून वर काढले आणि संजीवनी दिली. या महान चार संशोधकांवरील लेखमालिकेतला हा दुसरा लेख आहे.

हा महान शास्त्रज्ञ रोज सकाळी तुमच्या आमच्या भेटीला येतो. कुठे म्हणून काय विचारता? सकाळी तुमच्याकडे येणाऱ्या दुधाच्या पिशवीवर “पाश्चराइज्ड” असा शब्द छापलेला असतो. ती प्रक्रिया ज्या शास्त्रज्ञाने शोधली त्याचं नाव “लुई पाश्चर”. लुई पाश्चरबद्दल जाणून घेण्यापूर्वी पाश्चराइज्ड शब्दाचा अर्थ समजून घेऊया.

दुधासारखे नाशवंत पदार्थ तापवले नाही तर काही तासांतच नासून जातात. त्यासाठी दुध ६० डिग्री सेल्सिअसपर्यंत जर तापवून थंड केले तर ते ताबडतोब नासत नाही. म्हणूनच गावागावांतल्या गोठ्यांमधून ३६ ते ४८ तासांपूर्वी जमा झालेले दूध आपल्यापर्यंत पोहोचते तेव्हा ते ‘ताजेच’ असते. दूध नसण्याची प्रक्रिया एका विशिष्ट जंतूंमुळे होते आणि ते ६० डिग्री पर्यंत तापवल्यानंतर दुधात जंतूंची वाढच होत नाही. हा सिद्धांत मांडून त्याचा व्यवहारात उपयोग करणारा लुई पाश्चर हा पहिला शास्त्रज्ञ होता. म्हणून त्याच्या सन्मानार्थ या प्रक्रियेला “पाश्चरायझेशन” असं म्हणतात.

आंबणे, फसफसणे, नासणे ही एक जैविक क्रिया आहे आणि ती विशिष्ट जंतूंमुळेच घडून येते हा पाश्चरचा सिद्धांत होता. त्यानेच फरमेंटेशन हा शब्द त्यासाठी शोधून काढला. ज्या प्रक्रियेत शेवटी उपयुक्त पदार्थ तयार होतात ते ‘फरमेंटेशन’ आणि ज्यामध्ये टाकाऊ पदार्थ तयार होतात ते ‘प्युट्रीफिकेशन’.

पाश्चरने त्याच्या संशोधनाची सुरुवात केली तेव्हा या जंतू प्रक्रियांचा उपयोग माणसांना होणाऱ्या आजारासाठी होईल असे त्यालाही माहित नव्हते. त्याच्या संशोधनाच्या पायऱ्या आपोआप उलगडत गेल्या आणि तो पुढे जात राहिला. पेशाने रसायन शास्त्राचा अभ्यासक असलेला पाश्चर केवळ औत्सुक्यापोटी जीवशास्त्राचा अभ्यास करायला लागला आणि नंतर त्याच क्षेत्रात रमला. 

१८६४ साली फ्रान्सची वाइन इंडस्ट्री अचानक धोक्यात आली. तयार झालेली वाइन आंबट होऊन तिचं रूपांतर व्हिनेगर मध्ये व्हायला लागलं. सरकारसाठी हा मोठा आर्थिक फटका होता. ही समस्या सोडवण्यासाठी पाश्चरला आमंत्रित करण्यात आले. पाश्चरने वाइन खराब करणारे जंतू शोधून काढले. या जंतूंपासून संरक्षण कसे करायचे यावर उपाय पण शोधून काढला. वाइन ४२ डिग्री र्यंत गरम केली की जंतू मरतात आणि वाईनचा दर्जा पण कायम राहतो. हा उपाय त्याला कसा सुचला हे मात्र कोडेच आहे. हाच उपाय दूध नासू नये म्हणून दूधावर केल्यास दूध बराच काळ नासत नाही असाही त्याला शोध  लागला. म्हणून प्रक्रियेला त्यानंतर 'पाश्चरायझेशन' हे नाव मिळाले.

पाश्चरच्या सगळ्याच संशोधनात एक विशेषता अशी की त्याला समस्येचे कारण सापडले की उपायही आपोआप सुचायचे. त्याकाळी फ्रान्समध्ये राष्ट्रीय उत्पन्न शेतीप्रधान व्यवसायातून येत असे त्यामुळे पाश्चरचे सुरुवातीचे संशोधन त्या क्षेत्रातच होते. वाइन इंडस्ट्री नंतर रेशीम अळ्यांवर त्याने संशोधन केले. रेशीम तयार करणाऱ्या अळ्यांवर त्याकाळी अचानक एक संसर्गजन्य रोगाची साथ आली. अळ्यांवरती आणि त्यांच्या अंड्यांवरती काळे ठिपके येऊन अळ्या मरायला लागल्या. अळ्या नाहीत, तर त्यांचे कोशही नाहीत आणि कोश नाही म्हणजे रेशीम नाही.

वाईननंतर सरकारला सर्वाधिक उत्पन्न रेशमातून मिळत होते. साहजिकच ही समस्या पाश्चरपर्यंत नेण्यात आली. पाश्चरने ते काळे ठिपके एका प्रोटोझुवामुळे तयार होतात हे निरीक्षण केले आणि त्या प्रोटोझुवाचा नायनाट करण्याची पद्धत शोधून काढली. साहजिकच यामुळे रेशीम उद्योगाला जीवदान मिळाले. या प्रसंगानंतर कोंबड्यांना होणाऱ्या चिकन कॉलरावर पण पाश्चरने उपाययोजना केली.

या अनुभवानंतर त्याच्या संशोधनाचा सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे पाश्चरने लसीकरणाची प्रक्रिया शोधून काढली. तोपर्यंत ‘लस’ आणि ‘लसीकरण’ म्हणजे काय याची जगाला कल्पनाही नव्हती. त्याचा लसीकरणाचा पहिला प्रयोग त्याने अँथ्रॅक्सच्या जंतूंविरुद्ध केला. या संशोधनाच्या टप्प्यात त्याच्या लक्षात असे आले की मेंढ्यांमध्ये संसर्ग झालेले अँथ्रॅक्सचे जंतू वेगळे करून त्यांची वाढ स्वतंत्रपणे एखाद्या कल्चरमध्ये केले आणि त्यानंतर ते जंतू मारून टाकले, तर ते मेलेले जंतू जिवंत जंतूंना मारण्यासाठी उपयोगी पडतात. हे कसं होतं? मृत जंतू शरीरात गेल्यानंतर रक्तातल्या पेशी त्यांच्यावर हल्ला करून त्यांना नष्ट करतात. अशा प्रकारे शरीरातल्या पेशी जंतूंचा सामना करायला शिकतात आणि त्या रोगाचे जिवंत जंतू मारण्यासाठी त्या रक्तपेशी सज्ज होतात. थोडक्यात मृत जंतूंपासून तयार करण्यात आलेले हे रसायन म्हणजेच लस.

(अँथ्रॅक्सचे जंतू)

वैद्यकशास्त्रात लस आणि लसीकरणाचा पहिला यशस्वी प्रयोग लुई पाश्चरने केला. यानंतर त्याच्या संशोधनाची कमान उंचावत गेली आणि याचा कळस म्हणजे त्याने रेबीजवर (हायड्रोफोबिया) शोधलेली लस. फ्रान्समध्ये मेंढ्यांचे संरक्षण करण्यासाठी कुत्रे पाळले जायचे. या कुत्र्यांना रेबीजची लागण झाली की ते कुत्रे इतर कुत्र्यांवर आणि माणसांवर हल्ले करायचे. जखमी कुत्रे आणि माणसं यांनाही रेबीजची लागण व्हायची. आजही रेबीजवर लसीकरण हा एकच उपाय आहे. लुई पाश्चरच्या असे लक्षात आले की रेबीज झालेल्या कुत्र्यांच्या दूषित लाळेत रेबीजचे जंतू असतात. हे कुत्रे चावले की त्या व्यक्तीला किंवा प्राण्याला त्याची लागण होते. यासाठी त्याने जंतू शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या सूक्ष्मदर्शकात ते जंतू दिसत नव्हते. याचे मुख्य कारण म्हणजे ते तंत्रज्ञानच त्याकाळी अस्तित्वात नव्हते. त्याने दुसरे निरीक्षण असे नोंदवले की लागण झाल्यानंतर जंतूंची वाढ मेंदूत आणि मज्जारज्जूत होते.

यावर त्याने एक अभिनव तंत्र वापरून रेबीजवर लस तयार केली. पाश्चरने कुत्र्यांचे रक्त सशांच्या मेंदूत टोचायला सुरुवात केली.  थोडक्यात, रेबीजचे जंतू वाढवण्यासाठी सशाच्या मेंदूचा त्याने कल्चर म्हणून वापर केला. हे ससे काही दिवसांतच रेबीजने मरण पावले की त्यांचे मज्जारज्जू वेगळे काढून ते सुकवले जायचे. या सुकवलेल्या मज्जारज्जूंचा वापर करून पाश्चर ५%, १०%, १५% अशा प्रमाणात लस बनवायचा. लस तर तयार झाली, पण कोणत्या प्रमाणाची लस लागू पडेल हे शोधण्यासाठी पिसाळलेले कुत्रे ज्याला चावले आहे अशा एका माणसाची प्रयोगादाखल गरज होती.

थोड्याच दिवसांत ही संधी त्याच्या समोर चालतच आली. ‘जोसेफ मिस्टर’ नावाच्या ९ वर्षाच्या एका मेंढपाळ मुलाला पिसाळलेल्या कुत्र्याने अनेक चावे घेतले होते. दुसरा काही उपाय नसल्याने त्याच्या डॉक्टरने जोसेफला लुई पाश्चरकडे पाठवले. पाश्चरने वेगवेगळ्या प्रमाणातली लस सतत १४ दिवस त्याला टोचली. आणि आश्चर्य म्हणजे जोसेफ मिस्टर वाचला. अशारीतीने जोसेफ मिस्टर हा जगातला रेबीजचा पहिला वाचलेला रुग्ण होता. पिसाळलेला कुत्रा चावला की १४ इंजेक्शन का घ्यावी लागायची ते आता तुमच्या लक्षात आले असेल.

(लुई पाश्चर आणि जोसेफ मिस्टर)

त्यानंतरच काही दिवसांनी जोसेफ मिस्टर त्याच्या मित्राला घेऊन आला. त्यालाही पिसाळलेल्या कुत्र्याने अनेक चावे घेतले होते. पाश्चरने त्यालाही १४ इंजेक्शन्स दिली आणि त्याचाही जीव वाचला. २६ ऑक्टोबर १८८५ लुई पाश्चरने हे सर्व संशोधन अकॅडमी ऑफ सायन्ससमोर मांडले. यानंतर पाश्चरच्या रेबीजवरच्या संशोधनाला जगभरात मान्यता मिळाली.

पाश्चरचा मोठेपणा असा की उर्वरित आयुष्यात त्याला लकवा झाल्यावरही तो संशोधन करत राहिला. त्याच्या स्मरणार्थ १८८८ साली ‘इन्स्टिट्यूट पाश्चर’ या संस्थेची निर्मिती करण्यात आली.

पाश्चरचे कर्तृत्व सांगण्यासाठी कितीही शब्द लिहिले तरी ते अपुरेच पडतील. पण थोडक्यात सांगायचे झाले तर ते असे मांडता येईल की आज आपण ज्याला मायक्रो-बायोलॉजी म्हणतो त्या क्षेत्राची पायाभरणी पाश्चरने केली. लसीकरणाची पद्धत त्याने शोधून काढली. आजच्या काळातले सर्व संशोधन त्याच्या पायाभूत विचारांवरती उभे राहिले आहे.  या महान संशोधकाला बोभाटाचा सलाम.

 

आणखी वाचा :

डॉक्टरांना हात धुवायला शिकवणाऱ्या डॉक्टरची गोष्ट!! वाचा हात न धुतल्यानं काय होत ते...

टॅग्स:

sciencebobhata marathi infotainmentinfotainment marathimarathiBobhatabobhata newsmarathi newsbobhata marathimarathi bobhatabobhata infotainmentbobhata entertainmentmarathi infotainmentinfotainmentbobata

संबंधित लेख